मुंबई, 21 ऑगस्ट : कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आणि लॉकडाऊनमध्ये शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु असतानाही शाळा मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अजूनही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. पण विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आलं आहे. भारतात आजही 60 टक्के भाग हा ग्रामीण असल्यानं अनेक भागांमध्ये अजूनही मोबाईल नेटवर्क पोहोचलं नाही. काही वेळा घरच्या परिस्थितीमुळे तर काहींना केवळ वीज नाही, नेटवर्क नाही म्हणून तर काहींना घरात दोन वेळेचं जेवायला नाही तर मोबाईलवर शिक्षण कुठून घेणार अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. अशा परिस्थित जमल तसं एकमेकांना सहाय्य करून विद्यार्थी शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो खूप प्रेरणा देणार आहे. गावात नेटवर्क येत नाही म्हणून ही तरुणी 12 वे क्लास करण्यासाठी रेंज शोधत जंगलात येते आणि इथे जंगलात बसून अभ्यास करते.
देव प्रकाश मीना यांनी या मुलीचा फोटो ट्वीट केला आहे. 12 वीचे क्लास करण्यासाठी ही मुलगी रोज आपल्या गावापासून दूर जंगलात येते. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 तब्बल 12 तास ती जंगलात एकटीच अभ्यास करून पुन्हा आपल्या घरी परत जाते. यावेळी येणारी ऊन-पाऊस संकटं आणि इतर गोष्टींचा विचार करून चार भावांनी तिच्यासाठी जंगलात एक छोटं घर वजा खोपटं उभं केलं. इथे 12 तास बसून ही मुलगी अभ्यास करते. या मुलीचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या मुलीच्या धाडसाचं आणि शिक्षण्याच्या जिद्दीचं खूप कौतुक केलं आहे. याच बरोबर सरकारच्या अपुऱ्या पडणाऱ्या सोयीसुविधांवरही टीका केली आहे. कोरोनाच्या काळात आजही अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.