मुंबई, 23 नोव्हेंबर : अनेकांना आपलं वाहन असावं असं नेहमीच वाटतं. त्यामुळे लोकं कर्ज काढून कार किंवा बाईक घेतात. इंधनवाढीमुळे बाईकच्या विक्रीत फरक झाल्याचे फारसे ऐकायला येत नाही. परंतु, भविष्यातील इंधन दरवाढीचा धोका आणि इंधनाची एकूण कमतरता यामुळे सध्या इलेक्ट्रिक बाईकची मागणी वाढताना दिसतेय. यामुळे हल्ली मार्केटमध्ये विविध बाईक उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक बाईकच्या विक्रीवर भर देताना दिसतात. अशातच एका सुप्रसिद्ध बाईक कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये आणली आहे. रॉयल एनफिल्ड या नामांकित बाईक उत्पादक कंपनीची ही बाईक आकर्षक आहे. जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे.
रॉयल एनफिल्डच्या बाईक लोकांना नेहमीच भुरळ पाडतात. 1955 साली स्थापन झालेली ही कंपनी आजतागायत आपलं नाव आणि दर्जा टिकवून आहे. कंपनीच्या ताफ्यात 350 ते 650 सीसी इंजिन क्षमता असणार्या विविध बाईकस आहेत. परंतु, बाईकप्रेमी रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाईकची अनेक दिवस वाट पाहत होते. नुकतीच त्याची पहिली झलक अर्थात फोटो मीडियासमोर आले आहेत. या बाईकचं नामकरण अजून झालेलं नाही. परंतु, कंपनीने याचं जे तात्पुरतं नामकरण केलंय ते इलेक्ट्रिक 01 असं आहे. याचं डिझाईन नवं आहे. ही बाईक लॉंच होण्याची सगळेचजण आतुरतेनं वाट पाहत आहेत.
हे ही वाचा : कमी बजेटमध्ये नवी कोरी कार घ्यायची आहे? मग ही बातमी वाचाच
मार्केटमध्ये कधी लॉंच होणार ही बाईक
सध्या जे फोटो व्हायरल झालेत, ते बाईकच्या पहिल्या फेजमधले आहेत. पण ही बाईक इतक्यात मार्केटमध्ये येणार नाही. यासाठी काही कालावधी नक्कीच जाईल. कंपनीकडून असं समजतंय की, या नव्या मॉडेलला क्वालिटी फंक्शन डेव्हलपमेंट असं म्हटलं जातंय. रॉयल एनफिल्ड त्यांची कुठलीही बाईक मार्केटमध्ये आणण्यापूर्वी दीर्घकाळ त्यांच रोड टेस्टिंग करते.
जाणून घेऊयात बाईकच्या डिझाईनविषयी
मीडियामध्ये जे फोटो आलेत, त्यात बाईकचा पुढचा भागच फक्त दिसतोय. परंतु, त्यावरून बाईकच्या विविध गोष्टींबद्दल माहिती पुढे आली आहे. यात निओ विंटेज आणि क्लासिक स्टायलिंग असे दोन प्रकार आहेत. या बाईकचं फ्रंट सस्पेन्शन जे जुन्या बाईकप्रमाणेच आहे. परंतु, बाईकचा एकूण लूक हा रेट्रो स्टाईल आहे. याचे हेडलाईटस गोल आहेत.
हे ही वाचा : इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारच्या निर्णयानं होणार फायदा
तसंच फ्युएल टॅंकही पारंपरिक पद्धतीचा आहे. बाईकची चासी ही खूपच आकर्षक आहे. याचं दोन भागात वर्गीकरण झालं आहे. याचा एक भाग फ्युएल टॅंकच्या वर तर दुसरा भाग खालच्या बाजूस आहे. त्याचप्रमाणे बाईकचे अलॉय व्हिल्सही स्पष्टपणे दिसत आहेत.