नवी दिल्ली, 30 डिसेंबर : गेल्या काही वर्षांत यू-ट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी चांगले पैसे कमावत आहेत. हरियाणातला लोकप्रिय यू-ट्यूबर आणि अभिनेता दुष्यंत कुकरेजा हा त्यापैकीच एक होय. दुष्यंतने कमी कालावधीत मोठं यश मिळवलं आहे. दुष्यंतच्या यू-ट्यूब चॅनेलचे दोन कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. त्याच्या काही व्हिडिओजना 20 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. शॉर्ट्स व्हिडिओजच्या माध्यमातून दुष्यंतने हे यश मिळवलं आहे. दुष्यंतच्या एकूण प्रवासाविषयी सविस्तर जाणून घेऊ या. `आज तक`ने याबाबत माहिती देणारं वृत्त दिलं आहे. हरियाणातला 23 वर्षांचा प्रसिद्ध यू-ट्यूबर आणि अभिनेता दुष्यंत कुकरेजाने अल्पावधीत मोठं यश मिळवलं आहे. कामाची पद्धत, प्रयत्न आणि त्यातून मिळवलेल्या यशाबाबत दुष्यंतने ‘आज तक’शी संवाद साधला. 5 डिसेंबर 2022 रोजी वर्षातल्या टॉप-20 क्रिएटर्सची नावं यू-ट्यूबकडून घोषित करण्यात आली. या यादीत दुष्यंतचं नाव चौथ्या क्रमांकावर होतं. दुष्यंत कुकरेजाच्या यू-ट्यूब चॅनेलचे 2 कोटींहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत. तो त्याच्या चॅनेलवर प्रामुख्याने फनी शॉर्ट्स अपलोड करतो. त्याच्या अनेक व्हिडिओजना 20 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. `माझ्या चॅनेलच्या यशात माझ्या बहिणीची 50 टक्के मेहनत आहे,` असं दुष्यंत आवर्जून सांगतो. दुष्यंतची बहीण प्रियल कुकरेजादेखील यू-ट्यूब क्रिएटर आहे. प्रियलच्या यू-ट्यूब चॅनेलचे सुमारे 1.2 कोटी सबस्क्रायबर्स आहेत. दुष्यंत हरियाणातल्या हिस्सारचा रहिवासी आहे. त्याची आई शिक्षिका तर वडील बँकर आहेत. `मी इंजिनिअर व्हावं अशी माझ्या पालकांची इच्छा होती. मला शिक्षणात चांगली गती होती. इयत्ता दहावीला मला 90 टक्के मार्क्स मिळाले होते. त्यानंतर मी आयआयटी क्रॅक करू शकणार नाही, असं मला वाटलं आणि मी कॉमर्स शाखेतून इयत्ता बारावी झालो. बारावीला मला 87 टक्के मार्क्स मिळाले. त्यानंतर मी चंडीगड युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. याच युनिव्हर्सिटीतून मी एमबीएची पदवी घेतली आहे. ग्रॅज्युएशनला असतानाच मी टिकटॉक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना मी कंटेट क्रिएशनचं काम सुरू केलं. टिकटॉकवर बंदी येण्यापूर्वी या प्लॅटफॉर्मवर माझे सुमारे 23 लाख फॉलोअर्स होते. 2020मध्ये कोविड लॉकडाउन नंतर मी यू-ट्यूबवर सक्रिय झालो. सुरुवातीला मी यू-ट्यूबवर शिकत व्हिडिओ बनवू लागलो. मी चित्रपट जास्त पाहायचो आणि त्यातून वेगवेगळ्या गोष्टी शिकलो,` असं दुष्यंतने सांगितलं. `मी 2015मध्ये माझं यू-ट्यूब चॅनेल सुरू केलं होतं; पण गेल्या दोन वर्षांत मला त्यातून चांगलं यश मिळालं. यामागे अनेक वर्षांचे परिश्रम आहेत. गेल्या दोन वर्षांत माझं चॅनेल वेगानं प्रगती करतंय. दोन वर्षापूर्वी माझ्या चॅनेलचे केवळ 40 हजार सबस्क्रायबर्स होते. आता ही संख्या दोन कोटींपर्यंत पोहोचली आहे. यू-ट्यूबर शॉर्ट्स फीचर आल्यानंतर मी त्यावर काम करू लागलो. त्यामुळे माझ्या चॅनेलचे सबस्क्रायबर्स वेगानं वाढले. माझे अनेक व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. मला एक मिनिटापेक्षा कमी कालावधीचा शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. हे सगळं बुद्धी आणि मेहनतीचं काम आहे. स्क्रिप्टवर खूप काम करावं लागतं. दोन ते तीन तास केवळ कंटेंटवर विचार करण्यात जातात. व्हिडिओची निर्मिती 15 ते 20 मिनिटांत होते, `असं दुष्यंतने सांगितलं. दुष्यंतने व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारणही सांगितलं. तो म्हणाला, `मी जे शॉर्ट्स बनवले आहेत ते सामान्य आणि ट्रेडिंग विषयांवरचे आहेत. त्यामुळे लोकांना ते आपलेसे वाटतात आणि ते खूप व्हायरल होतात. माझी बहीण प्रियल व्हिडिओसाठी व्हॉइस ओव्हर देते आणि मी अभिनय करतो.` हेही वाचा - बारावीत नापास, नंतर UPSC मध्ये पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी, वाचा IAS अंजू शर्मांच्या यशाची कहाणी `आम्ही अमेरिका विरुद्ध भारत या विषयापासून शॉर्ट्स बनवायला सुरुवात केली. हा विषय भारतीयांना खूप आवडला. उदाहरणार्थ, आम्ही अशा तंत्रज्ञानावर एक व्हिडिओ बनवला आहे जे अमेरिकेत उपलब्ध आहे, पण भारतात नाही. अशा परिस्थितीत भारतीय जुगाड कशी काम करतात, याविषयी व्हिडिओ बनवले,` असं दुष्यंतने सांगितलं. `मला पूर्ण वेळ अभिनेता म्हणून काम करायचं आहे. मला यू-ट्यूबच्या माध्यमातून सर्व काही मिळवायचं आहे. यू-ट्यूबच्या माध्यमातून मला एका महिन्यात चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळालं आहे,` असं दुष्यंतने स्पष्ट केलं.