03 आॅक्टोबर : पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याची ओळख पटली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी ही माहिती दिली. गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांविरुद्ध आणखी सबळ पुराव्यांचा शोध सुरू आहे. गृहमंत्री म्हणाले, ’ एसआयटीला मारेकऱ्यांची माहिती मिळालीय. पण ठोस पुराव्याशिवाय आम्ही आता सांगू शकत नाही. आणि त्याचाच शोध आता चालू आहे. ’ पुढे ते म्हणाले, न्यायलयात ठोस पुरावाच लागतो. नाहीतर खटला टिकत नाही. कर्नाटक सरकारनं पुरावे देणाऱ्यांना 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली होती. बंगळुरूच्या राजा राजेश्वरी नगरमध्ये त्यांचं घर आहे. त्या आपल्या गाडीतून उतरत होत्या आणि बंगल्याचं गेट उघडत होत्या. तेवढ्यात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर 6 गोल्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या डोक्यात लागली, तर 2 गोळ्या छातीत लागल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गौरी लंकेश ह्या माजी पत्रकार आणि लेखक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. त्यांनी कर्नाटकमध्ये विविध दैनिकात लिखान केलंय. तसंच गौरी लंकेश पत्रिके नावाचं मासिक चालवायच्या. त्या या मासिकाच्या संपादिका होत्या. उजव्या राजकारण्यांविरोधात त्यांचं बरंच लिखाण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.