वर्धा, 22 जुलै : कोकणासह विदर्भातही मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी नद्या, ओढे वाहताना दिसत आहे. घरादारांमध्ये पाणी शिरले असून अनेक ठिकाणी धरणातून विसर्ग सुरू आहे. दरम्यान वर्ध्यातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुराचं पाणी क्रॉस करणारा एक तरुण दुचाकीसह वाहून गेल्याचं दिसत आहे. पिपरी येथील बंडू चिडे नाल्याच्या पुरातून रस्ता पार करीत होता. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुचाकीसह गेला वाहून. दरम्यान त्याला वाचविण्यात यश आलं आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यात उडी घेऊन बंडुला पाण्याबाहेर काढले. मात्र यात त्याची दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली. समुद्रापूर तालुक्यातील पिपरी येथे हा प्रकार घडला आहे. हे ही वाचा- BREAKING : महाड येथील गावात दरड कोसळली; तब्बल 30 घरं अडकल्याची भीती
दरम्यान वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यातील लालनाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून याच तालुक्यातील पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळं तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्याशिवाय 20 गावांचा संपर्क तुटला आहे. वडगाव - पिंपळगाव मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. सायगव्हान, सावंगी, लोखंडी, पिंपळगाव या गावाला पाण्याने वेढले आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.