मुंबई, 1 सप्टेंबर : सृष्टीत किती तरी अशी आश्चर्य असतात, की जी पाहून आपला त्यावर विश्वासच बसत नाही; मात्र तरीही त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. अमेरिकेतल्या येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये (Yellowstone National Park) नॉरिस गिझर बेसिन ( Norris Geyser Basin) हा तलाव त्यापैकीच एक. हा तलाव पाहिला, की कोणालाही त्यात उडी मारून डुंबावं किंवा पोहावं असं वाटतं; पण हा तलाव मात्र त्यात उतरण्यासारखा नाही. कारण त्याचं पाणी गरम, नव्हे नव्हे अक्षरशः उकळतं असतं. होय! हे खरं आहे. आतापर्यंत या तलावात उतरल्यामुळे किमान 20 जण गंभीररीत्या भाजले आहेत. कारण तिथलं पाणी जवळपास 100 अंश सेल्सिअस तापमानाला अक्षरशः उकळतच असतं. त्यामुळे तिथला आणि आजूबाजूचा चिखलही गरमच असतो. त्यात गेलेलं कोणीही भाजल्याशिवाय बाहेर येऊच शकत नाही. 2016 साली तिथे कॉलिन स्कॉट नावाचा 23 वर्षांचा एक पर्यटक पाय घसरून त्या तलावात पडला होता. त्याचा मृत्यू होणं साहजिकच होतं; पण त्याची तीव्रता इतकी होती, की त्याचं शरीर त्या अॅसिडिक पाण्यात अक्षरशः विरघळायला लागलं. डेंजर झोन (Danger Zone) अशी सूचना लिहिलेली असूनही तिथे जाण्याची चूक कॉलिनने केली होती. ती त्याला भोवली. एवढं होऊनही अनेक जण तिथे जाण्याचा प्रयत्न करतात. पार्कमध्ये प्रवेश करणाऱ्यांना आधीच या भयानक जागेबद्दल कल्पना दिली जाते आणि तिथे न जाण्याची सूचनाही केली जाते. तरीही अलीकडेच कनेक्टिकटमधल्या हार्टफोर्ड (Hartford, Connecticut) येथे राहणाऱ्या 26 वर्षांच्या मॅडलिन कॅसी या महिलेने तिथे जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या महिलेला 2000 डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचा दंड आणि एक आठवड्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. व्योमिंगमधल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेसोबत आणखीही दोन व्यक्तींनी या थर्मल पूलपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता. ही महिला आणि तिच्या साथीदारांनी या भयानक तलावाकडे जाण्यासाठी जो रस्ता वापरला, ते पाहून बाकीच्या व्यक्तीही तिथे जाण्याचा प्रयत्न करू शकतात, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सर्वांच्याच जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित महिलावर खटला दाखल करण्यात आला. 18 ऑगस्टला तिच्यावरच्या खटल्याची सुनावणी झाली. तिला 2000 डॉलर्सहून अधिक दंड (Fine) आणि आठवड्याभराच्या तुरुंगवासाची (Jail) शिक्षा कोर्टाने सुनावली.