मुंबई, 7 जून : गृहोपयोगी अशा अनेक वस्तू आपण बाजारातून खरेदी करत असतो. अलीकडच्या काळात वस्तू खरेदीसाठी ई-कॉमर्स (E-commerce) वेबसाईट्ससारखे पर्यायदेखील उपलब्ध झाले आहेत. थेट बाजारातून खरेदी करण्यापेक्षा अनेकजण ऑनलाइन खरेदीला (Online Shopping) विशेष पसंती देतात. काही वेळा वस्तू खरेदी केल्यानंतर, प्रत्यक्षात दुसऱ्याच वस्तूची डिलिव्हरी होणं, वस्तू खराब निघणं अशा स्वरुपाच्या अनेक गोष्टी घडतात. तसंच क्वचितप्रसंगी वस्तू खरेदी केल्यावर काही आश्चर्यकारक अनुभवदेखील येतात. असाच काहीसा आश्चर्यकारक अनुभव अमेरिकेतल्या (America) एका महिलेला आला. या महिलेने ऑनलाइन सेकंड हँड सोफा मागवला. हा सोफा जेव्हा घरी आला, तेव्हा त्याची तपासणी केली असता, या महिलेला आश्चर्याचा धक्का बसला. अर्थात यामागे कारण ही तसंच होतं. या सोफ्याच्या कुशनमध्ये महिलेला चक्क 28 लाखांची रोकड (Cash) सापडली. काही कारणांमुळे नव्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा अनेक लोक सेकंड हँड (Second Hand) वस्तू खरेदी करणं पसंत करतात. अशा वस्तू आता ऑनलाइनदेखील (Online) उपलब्ध आहेत. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधली विकी उमोडू (Vicky Umodu) ही महिला तिच्या नव्या घरासाठी ऑनलाइन फर्निचरचा (Furniture) शोध घेत होती. दरम्यान एका वेबसाईटवर तिला दोन सोफा (Sofa) आणि एक मॅचिंग खुर्ची दिसली. वेबसाईटवर या दोन्ही वस्तू विनामूल्य (Free) उपलब्ध होत्या. ``मी नुकतीच नव्या घरात शिफ्ट झाले आहे. या घरात कोणत्याच वस्तू नव्हत्या. त्यामुळे सोफा आणि खुर्ची पाहून मी खूपच उत्साहित होते. परंतु, क्षणभर मला वेबसाईटवरची माहिती खोटी वाटली. त्यामुळे मी सोफा विक्री करणाऱ्या संबंधित व्यक्तीला फोन कॉल करण्याचा निर्णय घेतला. नुकतंच आमच्या जवळच्या एका व्यक्तीचं निधन झालं आहे. त्यामुळे आम्ही घरातल्या काही वस्तू काढून टाकत आहोत, असं विनामूल्य फर्निचर देणाऱ्या कुटुंबानं मला सांगितलं. त्यामुळे मी तो सोफा खरेदी केला,`` असं उमोडू म्हणाल्या. ``सोफा घरी आणल्यावर मी त्याची तपासणी सुरू केली. त्यावेळी मला कुशनमध्ये (Cushion) काहीतरी आहे, असं जाणवलं. मला वाटलं की ते हीट पॅड असेल. परंतु जेव्हा मी कुशनची चेन उघडली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. कुशनमध्ये खूप सारी पाकिटं होती. त्यामध्ये हजारो डॉलर रक्कम होती. ही एकूण रक्कम सुमारे 28 लाख रुपये होती. एवढी रक्कम पाहिल्यावर मी तातडीनं फर्निचर विक्री करणाऱ्या कुटुंबाला फोन केला आणि त्यांना सर्व रक्कम देऊन टाकली,`` असं उमोडू यांनी सांगितलं. ``या सोफ्यात एवढी मोठी रक्कम लपवलेली आहे, ही बाब फर्निचर विक्री करणाऱ्या कुटुंबाला माहिती नव्हती. परंतु, पैसे परत मिळाल्याने त्या कुटुंबानं माझे आभार मानले आणि मला दोन लाख रुपये दिले. माझ्यावर आणि माझ्या मुलाबाळांवर देवाची कृपा आहे. आम्ही सर्व सुस्थितीत आणि जिवंत आहोत. मला तीन गोंडस नातवंडं आहेत. यापेक्षा अधिक मी देवाकडे काय मागू,`` असं विकी उमोडू यांनी सांगितलं.