अहमदाबाद, 21 मे : गुजरातमध्ये एक धक्कादायक अशी घटना समोर आली. एका गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सच्या आडवा सिंहांचा कळप आला. बराच काळ सिंह रस्त्यावरच आडवे थांबले. त्यांनी अॅम्ब्युलन्सभोवती फेऱ्या मारल्या. यामुळे शेवटी अॅम्ब्युलन्समध्येच महिलेनं मुलीला जन्म दिला. गुजरातमधील गढ्ढा जिल्ह्यातील भाका गावात राहणाऱी महिला अफसाना सबरिश रफीक हिला रात्री दहाच्या सुमारास प्रसूतीवेदना सुरू झाल्या. महिलेची तब्येत बिघडल्याने कुटुंबियांनी अॅम्ब्युलन्स बोलावण्याचा निर्णय़ घेतला. अॅम्ब्युलन्स आल्यानंतर कुटुंबातील लोकांसह दवाखान्याकडे जाण्यासाठी ते निघाले. गावापासून दूर काही अंतर जाताच त्यांच्या वाटेत सिंहांचा कळप आला. सिंह गाडीच्या आडवेच उभा राहिले. त्यावेळी सिंहांना तिथून घालवण्यासाठी प्रयत्न करणं धोक्याचं होतं. दरम्यान, महिलेला प्रसुतीकळा वाढत होत्या. या परिस्थितीत प्रसंगावधान राखत ईएमटी आणि ड्रायव्हरनं रस्त्यातच महिलेची प्रसूती केली.
महिलेनं एका मुलीला जन्म दिला असून दोघींची तब्येत ठीक असल्याचं समजतं. या संपूर्ण घटनेवेळी सिंह गाडीच्या भोवती फेऱ्या मारत होते. मात्र कोणीही मोठ्यानं हालचाल कऱण्याचा विचार केला नाही. त्यामुळेच सर्वजण सुखरूप बचावले. मुलीच्या जन्मानंतर काही वेळानंतर सिंह तिथून निघून गेले आणि नवजात बालिकेसह महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यात आले. हे वाचा : नवरदेवाला दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी पोलिसांनी अडवलं, लग्नासाठी असा काढला मार्ग