मुंबई, 19 नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांमध्ये मानव आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माणसानं वन्य प्राण्यांच्या अधिवासांमध्ये अतिक्रमण केल्यानं वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. वन्य प्राणी मानवी वस्तीमध्ये येतात आणि प्रशासन त्यांना हाकलण्यासाठी काहीच करत नाही, अशा तक्रारी अनेकदा केल्या जातात. पण, याला आपणच जबाबदार आहोत, याची जाणीव फार कमी लोकांना असते. जंगलांचा नाश झाल्यामुळे वन्य प्राणी शहराकडे येणं, हे स्वाभाविक आहे.
एका वन अधिकाऱ्यानं अशीच एक घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. आयएफएस अधिकाऱ्यानं एक दक्षिण भारतातील व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक सांबर प्रजातीचं हरिण चहाच्या टपरीवर पोहोचल्याचं दिसत आहे.
हे ही वाचा : तुमच्याकडे आहेत 7 सेकंद; चित्रातील काटेरी निवडुंग शोधा अन् स्वतःला सिद्ध करा, अनेकजण Fail
आयएफएस अधिकारी डॉक्टर सम्राट गौडा अनेकदा ट्विटरवर प्राण्यांशी संबंधित मनोरंजक व्हिडिओ पोस्ट करतात. नुकताच त्यांनी शेअर केलेला एक व्हिडिओ आश्चर्यकारक आणि चिंताजनकही आहे. “हे सांबर स्थानिक हॉटेलमध्ये गेलं तर तेथील लोक त्याला काय खायला देतील? गंभीरपणे सांगायचं झालं तर, वन्य प्राण्यांनी मानवी वस्तीमध्ये प्रवेश करणं योग्य नाही,” अशी कॅप्शन देऊन डॉक्टर गौडा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये एका चहाच्या टपरीच्या पायऱ्यांवर एक मोठं सांबर उभा असल्याचं दिसत आहे. सांबर ही हरणांची एक जात आहे जिची उंची खूप जास्त असते. व्हिडिओतील सांबरही अतिशय उंच आहे आणि त्याची शिंगही मोठी आहेत. चहा टपरीच्या आजूबाजूला उभे असलेले लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघत आहेत. एक वयस्कर व्यक्ती त्याला तिथून हाकलताना दिसत आहे. दुकानाच्या बोर्डवर लिहिलेली भाषा ही दक्षिण भारतीय आहे. त्यावरून हा व्हिडिओ दक्षिणेतील एखाद्या राज्यातील आहे, असा अंदाज लावला जात आहे.
हे ही वाचा : टेस्लाच्या ऑटोमॅटिक कारने उडवली सगळ्यांची झोप, धडकी भरवणारा Video व्हायरल
व्हिडिओवर नेटिझन्सनी दिल्या प्रतिक्रिया
या व्हिडिओला नऊ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं कमेंट केली आहे की, या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसतं की, वन्य प्राणी या पृथ्वीवरील सर्वात चलाख प्राण्यांवर किती सहज विश्वास ठेवतात. एका व्यक्तीनं कमेंट केली आहे की, मानवी वस्तीमध्ये प्राण्यांचे आगमन हे एक चांगलं लक्षण आहे. ते स्वतःचा विकास करत आहेत आणि अनेक मानव प्राण्यांबद्दल संवेदनशील आहेत, हे यावरून सिद्ध होतं.