नवी दिल्ली, 28 जून : एका फास्ट फूट रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या तीन मुलांना वेटरने बाहेर काढल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलांना हाय-फाय कपडे न घातल्याने त्यांना बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. कोणीतरी याचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. आता यावरुन निराशा व्यक्त केली जात आहे. जेव्हा वेटरने त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं त्यावेळी मुलांचा चेहराच उतरला. यावर अनेक नेटकरी आपलं मत व्यक्त करीत आहेत. त्यांचे कपडे कसे का असेना, मात्र जर ते खाण्याचे पैसे देऊ शकत असतील तर त्यांना अशी वागणूक देणं चुकीचं आहे. फूट चेन रेस्टॉरंटच्या या वागणुकीवर नेटकरींनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तीन लहान मुलं बसलेली होती. मात्र त्यांना पाहताच एक वेटर पुढे येतो आणि तिघांना बाहेर जायला सांगतो. यावेळी मुलांचा चेहरा पडतो.
ते त्या वेटरकडे एकटक पाहत राहतात. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत कोणतीही माहिती अद्याप कळू शकलेली नाही. व्हिडीओमध्ये दिल्यानुसार, रेस्टॉरंट अमेरिकन पिझ्झा चेन Sbarro आहे. ज्याचे भारतभरात अनेक स्टोअर्स आहेत.