व्हायरल व्हिडीओ
मुंबई, 14 डिसेंबर: फसवणुकीच्या आणि चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक गुन्हेगार लोकांची फसवणूक करून आणि चोरी करून पैसे मिळवण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधून काढतात. चोरीच्या घटनांबाबत अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटही तयार झालेले आहेत. हातचलाखी करून चोरी करणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही तुम्ही पाहिले असतील. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे; मात्र हा चोर पळून जाण्यात अयशस्वी ठरला आहे. त्याच्या मूर्खपणामुळे आणि दुकानदाराच्या हुशारीमुळे तो पकडला गेला आहे. त्यामुळे तो स्वतः चोरीचा माल परत करताना दिसत आहे. ‘नई दुनिया’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. @UOldGuy या ट्विटर अकाउंटवरून चोरीचा हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘डोन्ट बी अॅन इडियट’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला चोराचा वेडेपणा पाहून हसायला येईल. चोर मोबाइलच्या दुकानात पोहोचल्याचं व्हिडिओत दिसत आहे. यादरम्यान तो एक चूक करतो आणि दुकानदाराच्या तावडीत सापडतो. हेही वाचा - एका मिनिटात चोरल्या 7 कोटींच्या 5 लग्जरी कार, पोलिसही चकित, पाहा Video व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती दुकानात मोबाइल खरेदी करण्यासाठी येते. काउंटरजवळ उभं राहून तो माणूस फोनची तपासणी करतो. यादरम्यान दुकानदार कुठल्या तरी कामात व्यग्र आहे असं दिसल्यानंतर तो अचानक मोबाइल घेऊन पळू लागतो; मात्र दुकानदार आपल्यापेक्षा हुशार असल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही. चोर मोबाइल घेऊन दुकानाच्या दरवाजापर्यंत तर जातो, पण त्याला परत मागे फिरावं लागतं. कारण, दुकानाचा काचेचा दरवाजा आपोआप लॉक झालेला असतो. आपला चोरीचा प्रयत्न फसल्याचं लक्षात येताच चोर माघारी फिरतो आणि दुकानदाराला मोबाइल फोन परत करतो.
हा व्हिडिओ कुठला आहे, हे स्पष्ट झालेलं नाही; मात्र चोराने मोबाइल परत केल्यानंतर दुकानदार त्याला जाऊ देतो. तो कोणतीही पोलीस तक्रार करत नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसलं आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युझर्सनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. काही युझर्सनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बहुतांश जणांनी खळखळून हसण्याच्या इमोजी कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट केल्या आहेत.