मुंबई, 24 नोव्हेंबर: अलीकडच्या काळात प्रेमप्रकरणातून गंभीर गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. खून, खूनाचा प्रयत्न, मारहाण आदी घटना वारंवार घडत असल्याचं दिसून येत आहे. मात्र अमेरिकेत प्रेमप्रकरणातून एक विचित्र घटना घडली आहे. बॉयफ्रेंडच्या फोनवर दुसऱ्या मुलीचा आवाज ऐकताच गर्लफ्रेंडचा पारा चढला आणि तिने रागाच्या भरात बॉयफ्रेंडचं घर पेटवून दिलं. गर्लफ्रेंड केवळ हे कृत्य करून थांबली नाही तर तिने बॉयफ्रेंडच्या घरातील किमती वस्तू चोरल्या आणि पलायन केलं. या घटनेनंतर तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. या दुर्घटनेत सुमारे 50 हजार डॉलरचं नुकसान झालं आहे. `दैनिक भास्कर`ने या विषयीची वृत्त दिलं आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या सेनिडा नावाच्या तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडच्या घराला आग लावली. तिने तिच्या बॉयफ्रेंडच्या फोनवर दुसऱ्या मुलीचा आवाज ऐकला आणि त्यानंतर तिने रागाच्या भरात घराला आग लावली. ``ही घटना 21 नोव्हेंबरला रात्री दोन वाजता घडली. सेनिडाने रागाच्या भरात बॉयफ्रेंडच्या घराला आग लावली आणि तिने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेच्या दोन दिवसानंतर म्हणजेच 23 नोव्हेंबरला तिला अटक करण्यात आली आहे. सेनिडाने घराला आग लावल्यानंतर मला आशा आहे की तुझं घर सुरक्षित आहे, असा मेसेज बॉयफ्रेंडला केला. त्यानंतर या तरुणीला अटक करण्यात आली आहे,`` अशी माहिती पोलिसांनी दिली. हेही वाचा - ऐकावं ते नवलच! समुद्रात पडलेला आयफोन 1 वर्षाने सापडला, बटण दाबताच घडला ‘चमत्कार’ ही संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घरमालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान अग्निशमन दलास घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या परिश्रमाने ही आग आटोक्यात आणली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सुमारे 50 हजार डॉलर म्हणजेच 40.85 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले, ``23 वर्षाच्या तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला फोन केला होता. हा कॉल एका तरुणीने उचलला. अनोळखी तरुणीचा आवाज ऐकून सेनिडा संतप्त झाली. त्यानंतर रात्री उशिरा ती बॉयफ्रेंडच्या घरात घुसली आणि सर्वप्रथम हॉलमध्ये ठेवलेल्या सोफ्याला आग लावली. काही वेळातच ही आग संपूर्ण घरात पसरली. त्यानंतर तिनं घरातील काही मौल्यवान वस्तू चोरल्या आणि तिथून पलायन केले.`` तरुणीने रागाच्या भरात केलेल्या कृत्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅंडलवरून घराचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सोफा जळताना दिसत आहे.