तुर्की आणि सिरियातील भुकंपाचा फोटो
मुंबई, 06 फेब्रुवारी : सोमवारी सकाळी तुर्की-सीरियात भूकंप झाला. या भूकंपामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला. भूकंपामुळे येथे हाहाकार माजला आहे. देशाच्या आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण (AFAD) नुसार, 7.4 तीव्रतेच्या भूकंपानंतर आग्नेय तुर्की आणि आसपासच्या प्रदेशात किमान 66 आफ्टरशॉक बसले. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी पहाटे 7.8 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अल जजीराने (Al Jazeera) दिलेल्या माहितीनुसार दुपारी १ वाजेपर्यंत सिरियामध्ये 237 आणि टर्कीमध्ये 284 लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच 1 हजाराहून अधिक लोक गंभीर जखमी असल्याचं देखील सांगितलं जातंय. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. या भूकंपामुळे इमारती पूर्णपणे कोसळल्या. पहाटेच्या भूकंपाच्या वेळी अनेक लोक गाढ झोपले होते. त्यामुळे नक्की काय घडलं हे लोकांना कळलं नाही. त्यानंतर शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. तुर्कीमधील आपत्कालीन सेवा अधिकाऱ्यांनी प्राथमिक मृत्यूची संख्या 76 वर ठेवली आहे. मात्र आतापर्यंत 521 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. या आपत्तीने प्रमुख शहरांमधील डझनभर इमारती धुळीस मिळाल्या. दक्षिण-पूर्व तुर्कीमध्ये या भीषण आपत्तीनंतर गोंधळ उडाला आहे. या घटने दरम्यानचे आणि नंतरचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये या भुकंपाची तिव्रता आणि तेथील परिस्थीती पाहू शकता.
हे व्हायरल व्हिडीओ खरोखरंच थरकाप उडवणारे आहेत.