विमान
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : पुराच्या पाण्यातून साप येणं, घरात साप शिरून दंश करणं अशा घटना कुठे ना कुठे सर्रास घडत असतात; मात्र विमानात साप आढळल्याची घटना दुर्मीळच म्हणावी लागेल. अमेरिकेत एका विमानामध्ये नुकतीच अशी घटना घडली. विमान उतरल्यावर प्रवासी बाहेर पडण्याच्या तयारीत असताना प्रवाशांना साप दिसला. अर्थात कोणालाही सर्पदंश वगैरे झाला नाही; मात्र प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. विमान प्रवासात थरारक प्रसंग घडल्याचं अनेकदा वाचनात येतं. त्यावरून काही चित्रपटांची निर्मितीही झाली आहे. काही मजेशीर घटनाही विमानप्रवासात घडतात. काहीच महिन्यांपूर्वी भारतात नवी दिल्लीहून पाटण्याकडे जाणाऱ्या एका विमानात झुरळं आढळली होती. आता अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात साप आढळून आला आहे. याबाबत गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, हे विमान फ्लोरिडाच्या टाम्पा शहरातून न्यू जर्सीला निघालं होतं. विमान पोहोचल्यावर बिझनेस क्लासमधील एका प्रवाशाला साप दिसला. त्यानं विमानातल्या कर्मचाऱ्यांना त्याबाबत सूचना दिली. साप दिसताच सर्व प्रवाशांनी पाय वर घेतले व एकच गोंधळ उडाला. न्यू जर्सीमधल्या नेवार्क विमानतळावर विमान उतरल्यावर सापाला पकडण्यासाठी तज्ज्ञांना बोलावण्यात आलं. हेही वाचा - जत्रेत जाताय जरा जपूनच राहा! नागरिकांच्या जीवाशी खेळ; धडकी भरवणारा VIDEO VIRAL विमानातून सापाला पकडल्यानंतर मग प्रवाशांनी त्यांचं सामान घेतलं आणि ते बाहेर पडले. त्यानंतर संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. विमानात साप कुठून शिरला याचाही शोध घेण्यात आला; मात्र त्याबाबत काही कळू शकलं नाही. विमानात आलेला साप विषारी नव्हता, असं तज्ज्ञांनी सांगितलं. विमानातून पकडल्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आलं. या घटनेमुळे विमान उड्डाणांमध्ये व्यत्यय आल्याचं कोणतंही वृत्त नाही. तसंच या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रवाशांनी माहिती दिल्यामुळे विमानातल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ योग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. विमानात साप आढळण्याच्या घटना या आधीही घडल्या आहेत. मेक्सिकोला जाणाऱ्या एका विमानात 2016 साली एक मोठा साप आढळला होता. त्याआधी 2013मध्ये ऑस्ट्रेलियाहून पापुआ न्यू गिनीआला जाणाऱ्या एका विमानाच्या बाहेरच्या बाजूला अजगर दिसला होता. विमानात अशा प्रकारे जंगली प्राणी सापडणं प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतं. काही वेळा यामुळे गंभीर दुखापत घडू शकते किंवा जिवावरही बेतू शकतं. प्रसंगावधान राखणं हीच बाब या वेळी अत्यंत महत्त्वाची ठरते.