नवी दिल्ली 01 मार्च : तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर अनेकदा तुम्हाला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळत असतील. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही हैराण करणारे. अनेकदा अपघातांचे व्हिडिओही समोर येत असतात. सध्या अशाच एका अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हा व्हिडिओ पाहून सगळ्यांचाच थरकाप उडत आहे. व्हिडिओमध्ये एक ट्रकसोबत भीषण अपघात (Shocking Road Accident Video) घडल्याचं दिसतं. ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने ही घटना घडली. मात्र सुदैवाने पोलिसांनी या घटनेत चालकाला वाचवलं आणि त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हे प्रकरण चीनच्या झेजियांग येथील हांग्जो इथलं आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक गाडी ट्राफीक सिग्नल पार करून दुसऱ्या बाजूला जाते. गाडीच्या मागेच असलेला ट्रकही गाडीपाठोपाठ दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र ट्राफीक लाईटचा रंग बदलल्याने त्याला लगेचच ट्रक थांबवावा लागतो. यासाठी तो एमरजेंसी ब्रेकचा आधार घेतो. मात्र त्याला याची कल्पनाही नव्हती की त्याचा हा निर्णय किती जीवघेणा असू शकतो.
चालकाने ब्रेक दाबताच ट्रकमध्ये ठेवलेल्या स्टील प्लेट घसरून पुढच्या बाजूला येतात. ट्रकचा वेग इतका जास्त असतो की स्टीलच्या प्लेट कंटेनरला कापून ट्रकच्या केबिनमध्येही शिरतात. या घटनेदरम्यान चालकाने सीट बेल्ट लावलेला असतो. यामुळे तो केबिनमध्येच अडकतो. ही संपूर्ण घटना सिग्नलवर असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले.
पोलिसांनी चालकाचा जीव वाचवला. त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र ट्रकचं नुकसान झालं आहे. ही घटना चीनमध्ये 14 डिसेंबर 2020 ला घडली होती. घटनेचा व्हिडिओ आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. CatastrophicFailure नावाच्या Reddit यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत 1 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.