इस्लामाबाद, 10 जून: पाकिस्तानात (Pakistan) महिला नेत्यानं एका खासदाराच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या जवळच्या महिला नेत्या डॉक्टर फिरदौस आशिक अवान (Firdous Ashiq Awan) यांनी एका टीव्ही चॅनेलवर शोच्या रेकॉर्डिंग दरम्यान एका पाकिस्तानच्या खासदाराच्या कानाखाली वाजवली. पीपीपीचे खासदार कादिर मंडोखेल (Qadir Mandokhel) यांच्यासोबत फिरदौस यांचा रेकॉर्डिंग दरम्यान वाद झाल्याचं समजतंय. टीव्ही चॅनेलवर एका शोचं रेकॉर्डिंग सुरु होतं. त्यावेळी फिरदौस आणि कादिर यांच्या एका कारणावरुन वाद झाला. त्यानंतर फिरदौस एवढ्या भडकल्या की त्यांनी कादिर यांची कॉलर पकडली आणि त्यांच्या कानाखाली मारली.
फिरदौस आशिक अवान यांनी याआधी पंतप्रधान इमरान खान यांचं सहाय्यक म्हणून काम केलं आहे. सध्या त्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष सहाय्यक आहेत. खासदाराच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये इमरान खान यांचा पक्ष पीटीआयच्या नेत्या फिरदौस आशिक अवान शिव्या देताना दिसत आहेत. पत्रकार जावेद चौधरी यांच्या एक्सप्रेस टीव्ही चॅनेलवर एका शोच्या रेकॉर्डिंग ही घटना घडली आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अवान यांचं स्पष्टिकरण या घटनेनंतर फिरदौस यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, पीपीपी खासदार कादिर मंडोखेल यांनी मला आणि माझ्या वडिलांबद्दल अपशब्द वापरुन धमकी दिली. मी माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी खासदाराला कानाखाली मारली. तसंच कादिर मंडोखेल यांच्या विरोधात मानसिक छळाचा गुन्हा दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.