मुंबई लोकल
मुंबई, 4 फेब्रुवारी : मुंबई पोलीस दल आपल्या तत्पर सेवेमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की, स्कॉटलंड यार्ड पोलिसांनंतर मुंबई पोलीस दल हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोत्तम दल आहे. मुंबई पोलिसांची सोशल मीडिया टीमदेखील फार अॅक्टिव्ह आहे. ही टीम सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखल झालेल्या तक्रारींची लगेच दखल घेते आणि नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन केलं जातं. मुंबई पोलिसांची अशीच तत्परता दाखवणारी एक घटना समोर आली आहे. एका फोटो जर्नलिस्टनं दोन बेशिस्त नागरिकांचा लोकलमधील व्हिडिओ मुंबई पोलिसांना ट्विटरवर टॅग करून अपलोड केला होता. मुंबई पोलिसांनी या ट्विटला रिप्लाय दिला आहे. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईस्थित फोटो जर्नलिस्ट प्रशांत वायदंडे लोकलनं प्रवास करत होते. रेल्वे डब्यात एक पुरुष आणि एक महिला बेशिस्तपणे बसले होते. त्याचा व्हिडिओ प्रशांत यांनी शूट करण्यास सुरुवात केली त्यात महिला तर समोरच्या सीटवर पाय लांबवून बसली होती असं दिसत आहे. प्रशांत यांनी तिला पाय खाली ठेवण्याची विनंती केली असता ते दोघं भांडायला लागले. आपण दोघे वकील असल्याचं सांगत ते प्रशांत यांना व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापासून थांबवत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
प्रशांत यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी मुंबई पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांना टॅग केलं आहे. “@मुंबई पोलीस @सेंट्रल_रेल्वे @सीपीमुंबई पोलीस, स्वत:ला वकील म्हणवून घेणाऱ्या या दोन व्यक्ती ट्रेनमध्ये अशा बसल्या आहेत,” अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ पोस्ट केला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये जीआरपी मुंबईला मेन्शन केलं आहे. असं करून मुंबई पोलिसांनी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) दलाचं या प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे.
या व्हिडिओवर ट्विरवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरनं म्हटलं आहे की, समोरच्या सीटवर प्रवासी असो किंवा नसो त्या सीटवर पाय ठेवणं हा वाईट शिष्टाचार आहे. “दंड होऊनही ते सुधरणार नाहीत. रेल्वेने त्यांच्या रेल्वे प्रवासावर एका महिन्याची बंदी घातली पाहिजे किंवा ‘मी एक वकील असून, ट्रेनच्या सीटवर पाय ठेवला होता, सहप्रवाशाचा अनादर केला होता. मला माफ करा’, बोर्ड लावून दोन दिवस जागा स्वच्छ करण्याची शिक्षा दिली पाहिजे,” अशी कमेंट आणखी एका युजरनं केली आहे.