कोलकाता 20 नोव्हेंबर : एका व्यक्तीने असा दावा केला आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका ब्रँचमधून त्याला केवळ यासाठी माघारी पाठवण्यात आलं कारण त्याने शॉर्ट्स (Shorts in Bank) घातले होते. बँक स्टाफने (Bank Staff) त्याला फुल पॅन्ट घालून येण्यास सांगितलं. या व्यक्तीनं आता ट्विटरवर SBI कडे याबाबत तक्रार करत विचारलं की बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठीही ड्रेस कोड (Dress Code for Bank Customers) आहे का? कोलकातामध्ये (Kolkata) राहणाऱ्या आशिषच्या या प्रश्नाचं बँकेनं उत्तरही दिलं. आशिषने SBI ला टॅग करत आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की आज शॉर्ट्स घालून तुमच्या एका ब्रांचमध्ये गेलो. यावर मला असं सांगितलं गेलं की मी फूल पॅन्ट घालून परत येण्याची गरज आहे. कारण ग्राहकांनी सभ्यता ठेवावी अशी बँकेची अपेक्षा आहे. ग्राहकांनी काय घालावं याबाबत काही अधिकृत नियम आहेत का? आशिषच्या या ट्विटला रिप्लाय करत बँकेनं सांगितलं की असा कोणताही ड्रेस कोड नाही. या ट्विटला रिप्लाय करत SBI नं उत्तर दिलं की तुमची चिंता आम्हाला समजतीये आणि त्याचा आम्ही आदर करतो. आम्ही हे स्पष्ट करतो की ग्राहकांसाठी ड्रेस कोडबाबत कोणतेही नियम नाहीत. ते आपल्या आवडीनुसार तयार होऊ शकतात. तसंच सार्वजनिक ठिकाणी जाताना आपल्या मर्यादा, संस्कृती आणि परंपरांबद्दल काळजी घेऊ शकतात. आशिषच्या या ट्विटवर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. काहींनी यावरुन बँकेवर टीका केली आहे तर काहींनी त्याला फूल कपडे घालून बँकेत जाण्याचा सल्ला दिला आहे. आशिषने काही वर्षांपूर्वीच्या पुण्यातील एका घटनेचाही उल्लेख केला आहे. यात सांगितलं की SBI च्या टिळक रोडवरील ब्रांचमधूनही एका ग्राहकाला फूल कपडे न घातल्यानं परत पाठवण्यात आलं होतं. बँकेत शॉर्ट्स घालून गेल्यानं अनेकांनी आशिषची थट्टाही केली आहे. एका यूजरने लिहिलं, तुम्ही न्यूडही फिरलात तरी SBI ला काही अडचण नाही. मात्र त्यांना त्यांच्या ग्राहकांची चिंता आहे. मला खात्री आहे की तुम्ही ऑफिस किंवा लग्वात शॉर्ट्स घालून जात नसाल. मग इथेही काही चांगली कपडे घातली तर?