नवी दिल्ली, 19 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत चालला आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, पोलीस अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पोलीससुद्धा लॉकडाऊनचं उल्लंघन होऊ नये यासाठी दक्ष आहे. यादरम्यान त्यांच्यावर अनेक हल्लेही झाले. तरीही कर्तव्यात पोलिसांनी कोणतीही कसूर ठेवलेली नाही. सेवेसाठी आणि मदतीचा हात देण्यासाठी तत्पर असलेल्या या पोलिसांचा आणखी एक भावुक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात पोलिसांनी लॉकडाऊनदरम्यान एका चिमुकलीचा पहिला वाढदिवस अविस्मरणीय करण्याचं ठरवलं आणि केक घेऊन पोलीस पथक घरी पोहोचलं. सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि या छोट्या परीचा वाढदिवस स्मरणात राहिल असा साजराही केला. साहू यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत व्हिडीओ आपल्या अकाऊंटवर ट्वीट केला आहे.
पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंग राखत चिमुकलीचा वाढदिवस साजरा केला. कुटुंबीयांकडून आणि सोशल मीडियावर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लॉकडाऊनदरम्यान मुलीच्या वाढदिवसासाठी केक हवा होता. तो केक घरी पोहोचवण्यासाठी पोलिसांनी मदत केली आणि वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत केला. हे वाचा : कोरोनाची संशयित पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं म्हणून पत्नीनं घरीच केले उपचार कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशभरात 16,116 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असून मृतांची संख्या 519 वर पोहोचली आहे. हे वाचा : गर्भवती 7 किमी चालली, वाटेत असलेल्या क्लिनिकमध्ये डेन्टिस्टने केली प्रसूती |संपादन - सूरज यादव