प्रतिकात्मक फोटो
मुंबई २० नोव्हेंबर : इस्रायलमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असल्यानं पाण्याबाबतची अनेक संशोधनं तिथं होत असतात. नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यायला मिळावं, यासाठी अनेक अभ्यास होत असतात. त्याच प्रयत्नातून तिथल्या वॉटरझेन कंपनीनं पाणी बनवणारं एक मशीन तयार केलंय. हे मशीन सार्वजनिक वापरासाठी उपयुक्त असून, सध्या त्यांनी एका कारमध्ये ते बसवलं आहे. यामुळे कारमधल्या प्रवाशांना प्रवासात पाणी घेऊन जायची गरज नाही. कारमध्येच तयार केलेलं शुद्ध पाणी त्यांना पिता येईल. विशेष म्हणजे हे पाणी हवेपासून तयार करण्यात येतं. इस्रायलमधल्या वॉटरझेन या कंपनीने हवेपासून स्वच्छ पाणी तयार करणारं एक मशीन तयार केलंय. त्यांनी हे मशीन कारमध्ये बसवलं आहे. इस्रायलची राजधानी तेल अवीव या शहरात वॉटरझेनचं मुख्यालय आहे. तिथे या मशीनबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. या मशीनमध्ये हवेतली आर्द्रता शोषून घेऊन त्यापासून पाणी तयार केलं जातं. गाडीच्या डिकीमध्ये हे मशीन बसवून गिअरबॉक्सजवळ त्याचा एक नळ दिला जातो. त्याद्वारे प्रवाशांना पिण्याचं पाणी मिळतं. कोणत्याही गाडीमध्ये हे मशीन बसवता यावं, यासाठी कार उत्पादक कंपन्यांसोबत वॉटरझेनची चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीचं मशीन बनवण्यासाठी कंपनी काम करत होती. त्यातून वॉटर जनरेटरची निर्मिती झाली. त्याचा वापर घरांमध्ये आणि ऑफिसेसमध्ये केला जातो आहे. आता कंपनीने कारमध्ये बसवता येईल असं मशीन तयार केलंय. घरगुती वापरासाठी तयार करण्यात आलेल्या मशीनमध्ये 24 तासांत 30 लिटर पाणी तयार होतं. हे मशीन व्यवस्थित काम करण्यासाठी हवेत केवळ 20 टक्के आर्द्रता असली, तरी पुरेसं असतं, असं कंपनीचं म्हणणं आहे. हवेतली आर्द्रता शोषून त्यापासून तयार झालेल्या पाण्यात खनिजं, क्षार मिसळले जातात. त्यामुळे पाणी आरोग्यदायी होतं. घरगुती आणि ऑफिससाठी तयार केलेल्या मशीनला भारतासारख्या देशांमधूनही मागणी वाढते आहे, असं वॉटरझेन कंपनीसोबत काम करणाऱ्या एस. एम. व्ही. जयपुरिया ग्रुप या भारतीय कंपनीचं म्हणणं आहे. या दोन्ही मशीनबाबत भारतातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असं वॉटरझेनचे सीईओ मायन मुल्ला यांनी सांगितलं. वॉटरझेन कंपनीने मोठ्या ऑफिसेससाठी, सोसायटीसाठी, बिल्डिंगसाठी वापरता येतील, अशी मशीन्सही तयार केली आहेत. असंच एक मशीन वॉटरझेन कंपनीच्या मुख्यालयाच्या छतावर बसवलेलं आहे. हे मशीन 24 तासांत 800 ते 900 लिटर पाणी तयार करतं. याव्यतिरिक्त दिवसाला 6 हजार लिटर पाणी तयार करणारा एक मोठा वॉटर जनरेटरही तयार केल्याचं कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मिकी शोहम यांनी सांगितलं. सार्वजनिक पातळीवर हे मशीन वापरता येऊ शकेल. अशा पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या पाण्याची किंमत 50-60 पैसे प्रति लिटर असेल. जगात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. युनिसेफच्या एका अहवालानुसार, जगातल्या दर तिसऱ्या व्यक्तीला पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही.
भारतातही पिण्याच्या पाण्याचं संकट काही भागांत गंभीर बनलंय. 2050पर्यंत जगात पाण्याची टंचाई आणखी तीव्र होईल असा अंदाज आहे. त्यामुळे पाणी तयार करण्याबाबत शास्त्रज्ञ सातत्यानं संशोधन करत आहेत.