बंगळुरू, 29 नोव्हेंबर : पैसे खाल्ल्यामुळे भ्रष्ट ठरलेल्या व्यक्तींबद्दल नेहमी ऐकायला मिळतं, मात्र, कोणी खरेखुरे पैसे खात असेल यावर विश्वास बसेल का? कर्नाटकमध्ये अशी एक घटना घडलीय. एका 58 वर्षीय व्यक्तीनं तब्बल 187 नाणी गिळली होती. अचानक पोटदुखी सुरु झाल्यावर तपासण्या केल्या असता, डॉक्टरांना ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ती नाणी बाहेर काढली.
कर्नाटकमध्ये राहणारे दयमप्पा हरिजन 58 वर्षांचे आहेत. रायचूर जिल्ह्यातल्या लिंगसुगूर गावचे ते रहिवासी आहेत. शनिवारी 26 नोव्हेंबरला त्यांच्या अचानक पोटात दुखू लागलं. त्यांचा मुलगा रविकुमार यानं त्यांना बागलकोटमधल्या एस. निजलिंगप्पा मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेल्या एचएसके रुग्णालयात नेलं. त्यांची लक्षणं पाहता डॉक्टरांनी त्यांना एंडोस्कोपी करण्यास आणि एक्स-रे काढण्यास सांगितलं. दयमप्पा यांच्या ओटीपोटाचं स्कॅनिंग केल्यावर असं लक्षात आलं, की त्यांच्या पोटात. 12 किलोची नाणी आहेत.
दयमप्पा यांना स्किझोफ्रेनिया आहे. त्यांना नाणी गिळण्याची सवयही आहे. स्किझोफ्रेनियाचे रुग्ण विचित्र विचार करतात, वेगळं वागतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे दयमप्पा यांनी त्या पायी नाणी गिळली असू शकतात. त्यांनी तब्बल 187 नाणी गिळली होती. त्यात 5 रुपयांची 56 नाणी, 2 रुपयांची 51 नाणी आणि 1 रुपयाची 80 नाणी होती. 462 रुपये किमतीची ही नाणी काढणं हे डॉक्टरांसमोर आव्हान होतं. “ही खूप अवघड शस्त्रक्रिया होती. रुग्णाचं पोट फुग्यासारखं फुगलं होतं. पोटात सगळीकडे नाणीच नाणी होती. शस्त्रक्रिया विभागात आम्ही सीआर द्वारे नाणी शोधली. ती कुठे आहेत, याचा अंदाज घेऊन आम्ही ती काढली,” असं शस्त्रक्रिया करणारे प्रमुख डॉक्टर ईश्वर कलबुर्गी यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत आणखी दोन डॉक्टर होते.
वाचा - Video: रस्त्यावर क्रिकेट खेळत होते तरुण, अचानक भरधाव बाईक आली आणि...
या विचित्र गोष्टीबद्दल दयमप्पा यांच्या मुलाला मात्र अजिबात माहीत नव्हतं. त्यानं सांगितलं, की “वडील मानसिक रुग्ण होते, मात्र दैनंदिन कामं करत होते. त्यांनी नाणी गिळल्याबाबत कधीच घरात सांगितलं नाही. पोटात दुखू लागल्यावर आम्हाला त्याबद्दल सांगितलं, पण नाणी गिळल्याचं काहीच बोलले नाहीत. पोटाचं स्कॅनिंग केल्यावर आम्हाला ते कळालं.”
स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार आहे. यात रुग्णाचे विचार आणि अनुभव प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा वेगळे असतात. वास्तवाची जाणीव करून दिली, तरीही रुग्णाचा भ्रम तसाच राहतो. गैरसमज, भ्रम ही त्याची प्रमुख लक्षणं आहेत. त्याव्यतिरिक्तही काही लक्षणं आहेत. स्किझोफ्रेनियाच्या स्टेजवर त्याची लक्षणं अवलंबून असतात. अशा आजारामध्ये रुग्णाकडून नाणी गिळण्यासारखे प्रकार घडू शकतात. त्यामुळे मानसिक आजारात रुग्णाच्या जवळच्यांनी सतर्क राहणं गरजेचं असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Viral news