वसई (पालघर), 30 जानेवारी : काही गोष्टी आपल्याला अपेक्षित नसतात. त्या अचानक घडून जातात. त्या घटना अचानक घडण्यामागील कारण आपल्याला कळत नसलं तरी त्या खूप परिणामकारक ठरु शकतात. अशीच काहिशी घटना वसईत 28 जानेवारीला रात्री उशिरा घडली. वसईत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असलेल्या चारचाकी गाडीला अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पण यावेळी पेट्रोल पंपावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्याच्या या धडाकेबाज धाडसाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित घटना ही वसई पश्चिमेला असलेल्या सागर शेत पेट्रोल पंपावर घडली. या घटनेची भीषणता भरपूर होती. संबंधित घटना पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. त्याचे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत घटना पाहिली तर आगीवर नियंत्रण मिळवता आलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता, असं आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. पण गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. ( दरेकर म्हणतात, ‘त्यांना कार्यकर्ते जगवायचे, जनता मेली चालेल’, पटोलेंचंही उत्तर ) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय? संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत गाडीमध्ये पेट्रोल भरलं जात असल्याचं दिसत आहे. यावेळी कॅमेऱ्यासमोर पेट्रोल टाकण्याचं नोडल गाडीला लावलं असल्याचं दिसत आहे. त्यातून गाडीत पेट्रोल भरलं जात असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे याचदरम्यान गाडीच्या खालच्या भागात म्हणजे चारही टायरचा आतल्या भागात अचानक आग लागल्याचं जाणवतं. त्यानंतर पेट्रोलपंपावरील महिला कर्मचारी गाडीच्या दिशेला धावत जाते. ती पेट्रोल भरण्याचं नोडल गाडीतून बाहेर काढते. त्यानंतर तिथे आणखी एक कर्मचारी येतो. तोपर्यंत गाडीच्या खालच्या भागातील आग वाढू लागते.
यावेळी एक कर्मचारी धावत येऊन त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे तो लगेच त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतो. त्यानंतर गाडीचालक ती गाडी पुढे नेतो. पण आग पुन्हा लागते. गाडीचालक ती गाडी दुसऱ्या बाजूला लावून गाडी बंद करतो. त्यानंतर पुन्हा आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम केलं जातं. या घटनेत गाडीचं प्रचंड नुकसान होतं.