व्हायरल फोटो
मुंबई, 24 डिसेंबर : नाताळचा सण म्हटलं, की ख्रिश्चन बांधवांच्या घरामध्ये सर्वत्र तयारी सुरू असते. घरात सजावट करण्यासह आप्तस्वकीयांना वेगवेगळ्या अन्नपदार्थांची मेजवानी दिली जाते. नाताळ सणात अनेक घरं आणि कार्यालयांमध्ये ख्रिसमस ट्रीची सजावटही करण्यात येते. अशीच तयारी दक्षिण आफ्रिकेतल्या एका घरामध्ये सुरू होती. तेव्हा सजवलेल्या ख्रिसमस ट्रीकडे कुटुंबातल्या सदस्यांचं लक्ष गेलं आणि एकच गोंधळ उडाला. कारण त्यावर जहाल विषारी साप बसलेला होता. त्या कुटुंबीयांना काय करावं हे कळत नव्हतं. त्याच वेळी सर्पमित्राला पाचारण केल्याने कुटुंबातल्या सदस्यांचे प्राण वाचले. ‘डेली स्टार न्यूज’ वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेतल्या क्वीन्सबर्गमध्ये ही घटना घडली आहे. ख्रिसमस ट्री सजवत असताना त्यावर ब्लॅक मांबा हा जगातल्या सर्वांत विषारी सापांपैकी एक असलेला साप दिसला. त्याला पाहून साहजिकच घरातले सगळे जण घाबरले होते. एका क्षणासाठी कुटुंबातल्या सदस्यांना नेमकं काय करावं हे कळतच नव्हतं. परंतु प्रसंगावधान राखून तत्काळ सर्पमित्राला बोलावण्यात आले आणि त्याने सापाला पकडल्यानंतर कुटुंबातल्या सदस्यांचा जीव भांड्यात पडला. हेही वाचा - दुबईत ड्रायव्हिंग करणाऱ्या भारतीयाला लागला कोट्यवधींचा जॅकपॉट, गावासाठी करणार खर्च फेसबुकवर फोटो झाला व्हायरल क्वीन्सबर्गमधल्या एका कुटुंबामध्ये नाताळची जोरदार तयारी केली जात होती. तितक्यात ख्रिसमस ट्रीवर लक्ष जाताच कुटुंबीय घाबरून गेले. ख्रिसमस ट्रीवर ब्लॅक मांबा जातीचा साप बसलेला होता. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबातल्या व्यक्तींनी निक इव्हान्स नावाच्या सर्पमित्राला बोलावून घेतलं. निकने ब्लॅक मांबाला लगेच पकडलं व याचे फोटो फेसबुकवर शेअर केले. हे फोटो पाहता पाहता प्रचंड व्हायरल झाले. फोटो शेअर करताना निकने त्यावर मजेशीर कॅप्शन लिहिली. त्यात म्हटलं होतं की, ‘सांताने माझ्यासाठी या वेळी ख्रिसमसची ही भेट पाठवली आहे. हे माझं घर नसून, एका घरामध्ये ख्रिसमस ट्रीवर हा ब्लॅक मांबा लपला होता.’ निकने त्या सापाच्या तोंडाला पकडले असल्याचं फोटोत दिसतं. त्या सापाची लांबी सहा फूट असल्याचं निकने सांगितलं. फोटोत सापाच्या पाठीमागे ख्रिसमस ट्री दिसत आहे. सापाला वेळीच पकडल्याने कुटुंबीयांचे वाचले प्राण घरामध्ये ख्रिसमस ट्रीवर तो साप लपलेला होता. तो दिसताच कुटुंबीयांनी निक या सर्पमित्राला बोलवून घेतले. निकने चिमट्याच्या माध्यमातून त्या सापाला पकडलं व नंतर जमिनीवर ठेवून त्याला बंदिस्त करण्यात आलं. सापाला पाहून कुटुंबीय मोठ्या प्रमाणात घाबरले होते आणि असं होणं साहजिक असल्याचं निकचं म्हणणं आहे. विविध प्रतिक्रिया ख्रिसमस ट्रीवर साप आढळल्यानंतर निकने त्याला पकडलं. त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया येणं सुरू झालं. यात एका नेटिझनने लिहिलं, की असा प्रकार माझ्या घरात घडला असता तर नाताळचा आनंद केव्हाच संपला असता. आफ्रिकेमध्ये वन्य प्राणीही ख्रिसमसचा सण साजरा करतात, अशी कमेंट दुसऱ्या एका व्यक्तीनं केली.