मुलानं घेतला नागाचा चावा
आपण सर्पदंशाच्या घटनांविषयी नेहमीच ऐकतो, वाचतो. बऱ्याचदा विषारी सर्पाच्या दंशानंतर वेळेवर उपचार न मिळाल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. गेल्या काही वर्षांत सर्पदंशासंबंधी काही विचित्र घटना समोर आल्या आहेत. छत्तीसगड येथे नुकतीच घडलेली एक विचित्र घटना त्यापैकीच एक म्हणावी लागेल. पंडरापाठ इथल्या एका मुलास नागाने दंश केला. त्यानंतर तो मुलगा इतका संतापला, की रागाच्या भरात तो त्या नागाला चावला. या घटनेत नागाचा मृत्यू झाला असून, मुलाची प्रकृती स्थिर आहे. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. छत्तीसगडमधल्या जशपूर जिल्ह्यात साप, नागांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हा जिल्हा नागलोक म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात कोब्रा आणि क्रेटच्या अत्यंत विषारी प्रजाती आढळतात. येथे असलेल्या गुहेतून नागलोकात जातं येतं, असं म्हटलं जातं. येथे सापांच्या 70हून जास्त प्रजाती आढळतात. छत्तीसगडमध्ये आढळणाऱ्या सापांच्या सर्व प्रजातींपैकी 80 टक्के एकट्या जशपूरमध्ये आढळतात, असं सांगितलं जातं. याच जशपूर जिल्ह्यात सर्पदंशासंबंधी एक विचित्र घटना नुकतीच घडली. नागाने दंश केल्यानंतर एक मुलगा नागालाच चावला. या घटनेत नागाचा मृत्यू झाला. हेही वाचा - मृत्यूनंतर एकाच कुटुंबात मुलींचा पुनर्जन्म? ही सत्य घटना तुम्हाला विचार करायला लावेल पंडरापाठ येथे राहणारा दीपक राम नावाचा डोंगरी कारवा मुलगा त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या बहिणीच्या घरी गेला होता. तिथं खेळत असताना एका नागाने त्याच्या हाताला दंश केला. नाग चावल्याने धाडसी दीपक संतापला. नाग दूर निघून जाण्यापूर्वीच दीपकने नागाला पकडून त्याचा चावा घेतला. यादरम्यान नागाने दीपकच्या हाताला घट्ट वेटोळं घातलं होतं. अशाही परिस्थितीत दीपकने कडकडून चावा घेऊन नागाला गंभीर जखमी केलं. अखेरीस नागाचा मृत्यू झाला. आपल्या भावाला नागाने दंश केल्याचं समजताच दीपकच्या बहिणीने त्याच्यावर तातडीने उपचार केले. दीपकचे कुटुंबीय त्याला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले. आता दीपकची प्रकृती स्थिर आहे.
`मी माझ्या बहिणीसोबत खेळत होतो. मागून नाग आला आणि त्याने मला दंश केला. मीदेखील त्या नागाला पकडलं आणि त्याचा चावा घेतला. या घटनेची माहिती मी माझ्या बहिणीला दिली आणि तिनं आजोबांना सांगितली. यानंतर उपचारासाठी मला रुग्णालयात नेण्यात आलं. आता मला कोणताही त्रास नाही,` असं दीपक रामने सांगितलं. सध्या दीपकची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.