अजब-गजब
मुंबई 3 नोव्हेंबर : नात्याला कोणाचं बंधन नसतं. ते कोणासोबत जोडावं हाही ज्याचा त्याचा प्रश्न असतो. जात, धर्म, इतकंच काय, लिंगभेदाच्याही पलीकडे नाती जोडली जातात. समाज-रूढींच्या पलीकडे जाऊन केलेली लग्नं म्हणूनच चर्चेचा विषय ठरतात. असंच एक लग्न सध्या चर्चेचा विषय ठरलंय. मिस अर्जेंटिना आणि मिस प्युअर्टो रिको या दोघींनी एकमेकींशी लग्न केल्याचं नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून जाहीर केलंय. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मिस अर्जेंटिना असलेली मारियाना वरेला आणि मिस प्युअर्टो रिको असलेली फॅबियोला व्हॅलेंटाइन यांनी एका सौंदर्य स्पर्धेत अर्जेंटिना आणि प्युअर्टो रिकोचं प्रतिनिधित्व केलं होतं. मिस ग्रँड इंटरनॅशनलच्या दौऱ्यात 2020मध्ये त्या एकमेकींना भेटल्या. त्यानंतर त्यांच्यातली जवळीक वाढली व आता 28 ऑक्टोबर 2022ला दोघींनी लग्न केलंय. त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर त्यांनी दोन वर्षांतल्या त्यांच्या नात्याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘आमचं नातं गोपनीय ठेवल्यानंतर आता 28 ऑक्टोबरला हे दार आम्ही उघडलं आहे. जगासमोर आमचं नातं आम्ही जाहीर करत आहोत,’ असं त्यांनी या व्हिडिओच्या खाली लिहिलं आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट झाल्यावर लगेचच भरपूर व्हायरल झाला. या व्हिडिओला 2 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर लाखो जणांनी तो लाइक केला आहे. दोघींच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत; मात्र दोन वर्षांनी त्यांना जोडप्याच्या रूपात पाहून काही चाहत्यांना धक्का बसला आहे.
हा व्हिडिओ दोघींच्या आनंदाच्या क्षणांचा आहे. या व्हिडिओत त्या सुट्टीचा आनंद घेताना दिसताहेत. त्याच वेळी लग्नासाठीच्या प्रपोझलसाठी सजवलेली खोली व्हिडिओत दिसते आहे व दोघी एकमेकींना अंगठी घालताना दिसताहेत. व्हिडिओच्या शेवटी लग्नाच्या दिवसाचे काही क्षण दिसत आहेत. त्यात त्यांनी पारंपरिक पांढरा ड्रेस घातलेला आहे.
मिस ग्रॅंड इंटरनॅशनलच्या अधिकृत अकाउंटवरही त्यांचा फोटो शेअर करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यांचं प्रेम असंच राहूदे व जोडप्याला कोणाची दृष्ट लागू नये अशा आशयाची ओळही त्यावर लिहिण्यात आली आहे. मारियाना वरेला आणि फॅबियोला व्हॅलेंटाइन यांच्याबाबत काही चर्चाही झाल्या होत्या; मात्र त्यांनी त्यांचं नातं बरंच गुप्त ठेवलं होतं. आता अधिकृतरीत्या त्यांनी ते जाहीर केलं आहे. यामुळ त्यांच्या काही चाहत्यांना धक्का बसला आहे, तर काहींनी अभिनंदनाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.