व्हायरल व्हिडीओ
मुंबई 10 जानेवारी : सोशल मीडियावर डू इट युअरसेल्फ प्रकारातले व्हिडिओज खूप पाहिले जातात. त्याशिवाय किचन हॅक्स, क्लीनिंग हॅक्स अशाही व्हिडिओजना खूप पसंती मिळते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये असं दिसतंय, की एका तरुणाने किचनमध्ये जुगाड करून ट्रेडमिलचा व्यायाम केला. विशेष गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही आवडला व त्या किचन ट्रेडमिलचे ते फॅन झाले. सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे यामुळे लोकांमधले कलागुण समाजापुढे येतात व त्यांना लोकप्रियता मिळते. कोणी टाकाऊतून टिकाऊ वस्तू करतं, कोणी एखादं मशीन तयार करतं, कोणी सुंदर कपडे शिवतं, तर कोणी एखादा छान पदार्थ तयार करतं. यामुळे नव्या कल्पना जगासमोर येतात. अशीच एक भन्नाट कल्पना या व्हिडिओत दाखवलीय. ती पाहून चक्क आनंद महिंद्रा हेही त्याचे फॅन झाले. व्हिडिओत सुरुवातीला एक व्यक्ती किचनमध्ये भांडी घासायचा लिक्विड सोप फरशीवर ओतते. त्यावर थोडं पाणी ओतते आणि ट्रेडमिलचं बटण दाबल्याप्रमाणे ओट्यावर बटण दाबून किचनमधली भन्नाट ट्रेडमिल सुरू करते. हळूहळू त्याचा स्पीड वाढवत नेऊन घरगुती ट्रेडमिलवर ती व्यक्ती धावायलाही लागते. जगातली सर्वांत स्वस्त ट्रेडमिल असं त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. खरोखरच किती अनोखी कल्पना आहे, तेही खूपच कमी पैशात. गुळगुळीत फरशी साबणाच्या साह्यानं आणखी घसरडी करून त्याचा उपयोग ट्रेडमिलसारखा करता येऊ शकतो, ही कल्पनाच खूप वेगळी आहे.
प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केलाय. आत्तापर्यंत 1.8 मिलियन व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. 64 हजारांहून अधिक लाइक्सही व्हिडिओला मिळाले आहेत. अशा भन्नाट व्हिडिओजवर नेटिझन्स भरपूर प्रतिक्रिया देतात. याही व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
एका युझरने लिहिलंय, ‘सावधानी हटी दुर्घटना घटी! हे करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे.’ ‘ट्रेडमिल रनिंग केल्यानंतर काही वेळानं…तो तरुण जमिनीवर पडला,’ असं आणखी एकानं लिहिलंय. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कल्पनेचं अनेकांनी कौतुक केलं; मात्र काहींनी त्यावर चिमटेही काढले. ‘कल्पना तर उत्तम आहे, पण नंतर फरशी साफ करणाऱ्या महिलेची काय अवस्था झाली असेल?’ असा सवाल एकानं केलाय. भारतीय व्यक्ती अशा प्रकारे अनेक जुगाड करत असतात, अशा आशयाच्या प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या, तर बऱ्याच जणांनी असं करणं धोकादायक ठरू शकतं असं म्हटलंय.