प्रतिकात्मक फोटो
मुंबई १० नोव्हेंबर : सध्याच्या काळात मानवी नातेसंबंध बरेच गुंतागुंतीचे बनले आहेत. विविध कारणांमुळे वैवाहिक नातेसंबंधामध्ये दुरावा येण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. पक्ष्यांच्या दुनियेतदेखील काही वेगळी स्थिती नाही. माणसाला नातं सांभाळण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना दुसरीकडे पक्ष्यांमध्ये ब्रेक-अप होण्याचं प्रमाण वाढलं आहे. एका अभ्यासातून या संदर्भात खुलासा झाला आहे. जे पक्षी लांबचा प्रवास करतात म्हणजेच दोन हंगामांदरम्यान हजारो किलोमीटर दूर स्थलांतर करतात, त्यांच्यात ब्रेक-अप होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं एका अभ्यासातून दिसून आलं आहे. अर्थात यामागे काही गंभीर कारणं आहेत. माणूस स्वतःसोबत दुसऱ्या जीवांचं जीवनदेखील बिघडवत असल्याचं स्पष्ट झालं आहे. माणसांमुळे कार्बन-डाय-ऑक्साइडचं उत्सर्जन वाढत आहे. जंगलं तोडली जात आहेत. नवीन शहरं वसवली जात आहेत. अशा परिस्थितीत स्थलांतरी पक्ष्यांची पैदास आणि खाद्याच्या जागांवर परिणाम होत आहे. पक्ष्यांच्या 90 टक्के प्रजातींतले पक्षी आयुष्यभर आपल्या जोडीदारासोबत एकनिष्ठ राहतात. परंतु, एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की 232 प्रजातींतले पक्षी आता त्यांच्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहत नाहीत. नर आणि मादी पक्षी आपल्या जुन्या जोडीदाराला सोडून नव्या जोडीदाराचा शोध घेऊ लागले आहेत. यामागे हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ ही कारणं आहेत. या गोष्टींना अर्थात माणूसच कारणीभूत आहे. हे ही वाचा : चोराचं नशीब खराब की दुकानदार हुशार? हा Video पाहून तुम्हीच ठरवा चीनमधल्या सुन याट सेन विद्यापीठाचे संशोधक लियू यांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष्यांच्या 232 प्रजातींचा अभ्यास केला. खाद्य आणि प्रजननासाठी वर्षातून दोनदा स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये ब्रेक-अपचं प्रमाण जास्त असल्याचं लियू यांच्या अभ्यासातून समोर आलं आहे. केवळ उडणारे पक्षीच नव्हे, तर एम्परर पेंग्विंनमध्येदेखील ब्रेक-अपचं प्रमाण 85 टक्क्यांनी वाढलं आहे. याशिवाय पिपिंग प्लोव्हर या पक्ष्यांमध्ये ब्रेक-अपचं प्रमाण दोन तृतीयांश वाढलं आहे. मलार्ड्स नावाचे स्थलांतरित पक्षी अत्यंत निष्ठावान समजले जातात; पण या पक्ष्यांमध्ये ब्रेक-अपचं प्रमाण 9 टक्के आहे. ऑस्ट्रेलियातल्या आर्मीडेलमधल्या न्यू इंग्लंड युनिव्हर्सिटीतले पक्षी शास्त्रज्ञ जिसेला कॅप्लान यांनी सांगितलं, की `लांबचा प्रवास करताना पक्ष्यांना वेगवेगळ्या हवामानातून जावं लागतं. यामुळे त्यांच्यात मानसिक तणाव निर्माण होतो. त्यांचं आरोग्य बिघडतं. अशा स्थितीत सोबत असलेल्या पक्ष्यांसह परतणं कठीण असतं. कधी कधी एखाद्या पक्ष्याने खाण्यास किंवा प्रजननास नकार दिला, तर सोबतचे पक्षी त्याला सोडून देतात. माणसांमुळे वाढलेलं प्रदूषण, हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ यांशिवाय, प्रतिकूल हवामान, वादळ आणि अन्य प्रकारची तीव्र हवामान स्थिती यामुळे असं घडत असावं. अशा प्रकारची बहुतांश प्रकरणं ब्लॅक ब्रोड अल्बाट्रोस पक्ष्यांमध्ये पाहायला मिळतात.` उष्ण हवामानामुळे स्थलांतरी पक्ष्यांमधली उडण्याची क्षमता, प्रजनन क्षमता आणि मानसिक संतुलन बिघडत आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सातत्याने वाढत आहे. ज्या ठिकाणी जाऊन हे पक्षी प्रजनन करतात, त्या ठिकाणचं हवामान बऱ्याचदा प्रतिकूल असते. उदाहरणार्थ, भारतात हिवाळा उशिरा सुरू झाला, तर रशियातून येणाऱ्या पक्ष्यांना हे कळत नाही आणि त्यांना त्रास होतो. प्रजननावेळी नर पक्ष्याच्या परफॉर्मन्सवर अनेक कारणांमुळे परिणाम होतो. खाद्य न मिळणं, थकवा, प्रतिकूल हवामान, हवामान बदल, अतिउष्मा या गोष्टींचा त्यात समावेश असतो. या गोष्टी केवळ नर पक्ष्यावरच नव्हे, तर मादीवरही परिणाम करतात. अशा स्थितीत हे पक्षी नव्या जोडीदाराचा शोध सुरू करतात.
युनिव्हर्सिटी ऑफ लिस्बनमधले पक्षी जीवशास्त्रज्ञ फ्रान्सिस्को व्हेंच्युरा यांनी सांगितलं, की `माणसांप्रमाणे पक्षीदेखील एकमेकांवर आरोप करत असतात. प्रजननावेळी लांबून येणाऱ्या थकलेल्या नर पक्ष्याची कामगिरी खराब असेल, तर आपल्या नरामध्ये आता दम राहिलेला नाही, असं मादी पक्ष्याला वाटू लागतं आणि ती दुसऱ्या नर पक्ष्याचा शोध सुरू करते. या गोष्टी पक्ष्यांमधल्या नातेसंबंधात दुरावा निर्माण करतात.` एकूणच माणसाच्या कृत्यामुळे निसर्गावर होणाऱ्या विपरीत परिणामांनी आता परिसीमा गाठली आहे.