नशीब असावं तर असं! दररोज भीक मागणारा मुलगा रातोरात झाला कोट्यधीश
मुंबई, 17 डिसेंबर: उत्तराखंडमधल्या एका दर्ग्याच्या बाहेर भीक मागणाऱ्या दहा वर्षांच्या मुलाचं आयुष्य एखाद्या परिकथेप्रमाणे बदललं आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे या गरीब-अनाथ मुलाच्या आयुष्यात बदल झाला आहे. दररोज भीक मागून कशीबशी गुजराण करणारा हा मुलगा एका रात्रीत कोट्यधीश झाला आहे. 10 वर्षांचा मुलगा करोडो रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. एका वर्षापूर्वी तो आपल्या कुटुंबापासून दुरावला होता. त्यानंतर तो दर्ग्यात भीक मागू लागला. या मुलाचं सत्य समजल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शाहजेब आलम असं या मुलाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशातल्या सहारणपूरमधल्या पंडोली गावातला रहिवासी आहे. हा मुलगा जवळपास एक वर्षापासून उत्तराखंडमधल्या पिरान कालियार दर्ग्याबाहेर भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होता. 2019मध्ये दीर्घ आजाराने या मुलाच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या मृत्यूच्या काही महिने आधी शाहजेबची आई इमरानाने आपल्या पतीला सोडलं होतं. ती मुलासह आपल्या माहेरी राहत होती. नंतर ती शाहजेबसोबत पिरान कालियार इथे राहायला गेली आणि उदरनिर्वाहासाठी लहान-मोठी कामं करत होती. 2021मध्ये इमरानाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तेव्हापासून शाहजेब एकाकी पडला होता. हेही वाचा: 1 जानेवारीपासून बदलणार बँकाशी संबंधित ‘हा’ नियम, तुमच्यावर काय होणार परिणाम? जेव्हा शाहजेब एकदम निराधार झाला तेव्हा त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला सुफी संप्रदायाच्या पिरान कालियार इथल्या प्रतिष्ठित तीर्थक्षेत्रात आश्रय घेण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून शाहजेब तिथे भीक मागून जगत होता. यादरम्यान, 2021मध्येच शाहजेबच्या आजोबा मोहम्मद याकूब (वडिलांचे वडील) यांचा मृत्यू झाला. याकूब यांनी आपल्या मृत्युपत्रात आपल्या स्थावर मालमत्तेचा काही भाग त्याचा दिवंगत मुलगा नावेदचा मुलगा शाहजेबच्या नावे केला. मृत्यूपत्रानुसार 5 बिघा जमीन आणि दुमजली घर शाहजेबच्या नावावर झालं. या मालमत्तेची किंमत दोन कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. शाहजेब त्याच्या वडिलांच्या मृत्यूच्या अगोदरपासूनच कुटुंबीयांपासून दुरावला होता. त्याच्या आजोबांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी शाहजेबचा चौफेर शोध सुरू केला. तो पिरान कालियारमध्ये भीक मागून जगत असल्याची माहिती त्यांनी मिळाली. त्यांनी लगेच तिथे जाऊन त्याला घरी परत आणलं. सध्या तो आपल्या कुटुंबीयांसोबत राहत आहे. शाहजेबचे नातेवाईक शाह आलम यांनी सांगितलं, “आम्हाला शाहजेब परत मिळाला ही आमच्या कुटुंबासाठी सणापेक्षा मोठी गोष्ट आहे. तो आम्हाला मिळेल अशी आशाही आम्ही सोडून दिली होती. आम्ही त्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता; पण त्याचा फारसा फायदा झाला नाही; पण आता तो आम्हाला परत भेटला आहे. तो हळूहळू सर्वांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला थोडा वेळ लागेल. एवढ्या लहान वयात त्यानं बरेच चांगले-वाईट अनुभव घेतले आहेत.