न्यूयॉर्क, 18 जुलै : कोण कुठल्या वयात कसला विक्रम करील याचा काही नेम सांगता येत नाही. शिवाय, विक्रमासाठी शरीराच्या कोणत्या अवयवाचा उपयोग केला जाईल, याबद्दलही काही सांगता येत नाही. आता अमेरिकेतल्या बॉब सलेम (Record with Nose) यांचंच बघा ना! ते 53 वर्षांचे आहेत. नुकतेच ते चर्चेत आले आहेत एका वेगळ्याच प्रकारच्या विक्रमामुळे. तसा विक्रम त्यांच्याआधीही काही जणांनी केला आहे; मात्र 21व्या शतकात तो विक्रम करणारे ते पहिलेच आहेत. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. नेमकं काय केलंय त्यांनी? तर, त्यांनी नाकाच्या साह्याने एक अनोखा विक्रम केला आहे. त्यांनी एक शेंगदाणा आपल्या नाकाच्या साह्याने ढकलत हजारो फूट उंचीच्या डोंगराच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचवण्याचा विक्रम केला आहे. कोलोरॅडोमधल्या (Colorado) मॅनिटो स्प्रिंग्ज शहरात ते राहतात. पाइक्स पीक या 14,115 फूट उंचीच्या डोंगरशिखरावर एक शेंगदाणा नाकाच्या साह्याने ढकलत नेण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. 9 जुलैला त्यांनी सुरुवात केली आणि सात दिवसांत त्यांनी हे आव्हान पूर्ण केलं. 15 जुलैला हा विक्रम केल्यानंतर त्यांना शहराच्या महापौरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आलं. सिटी ऑफ मॅनिटो स्प्रिंग्ज (City of Manitou Springs) या शहराच्या अधिकृत फेसबुक पेजवर बॉब यांच्या या विक्रमाचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
याआधी 1976 साली टॉम मिलर (Tom Miller) यांनी अशा प्रकारचा अनोखा विक्रम केला होता. त्यांनी 5 दिवसांच्या आत शेंगदाणा नाकाच्या (Peanut propelling with the use of Nose) साह्याने ढकलून पर्वतशिखरापर्यंत (On the tp of mountain) पोहोचवला होता. त्याचप्रमाणे 1929 साली बिल विल्यम्स 22 दिवसांत, तर त्यापुढे काही वर्षांनी अलीसेस बॅक्स्टर यांनी 5 दिवसांत असाच विक्रम केला होता. बॉब सलेम (Bob Salem) असा विक्रम नोंदवणारे 21 व्या शतकातले पहिले मानकरी ठरले आहेत. आपल्या भावना व्यक्त करताना बॉब सलेम म्हणाले, की ‘शहराच्या 150व्या सोहळ्याच्या निमित्ताने हा विक्रम केल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे.’ बॉब यांच्या या विक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि बॉब यांचं कौतुक केलं आहे.