मुंबई, 10 फेब्रुवारी : इंटरनेटवर सध्या एका 3 वर्षाच्या मुलीचा व्हिडीओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. या तीन वर्षांच्या चिमुरडीचा व्हिडीओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियाच्या टाईमलाईनवर शेअर केला आहे. यामध्ये ही कलाकार मुलगी आपल्या वडिलांबरोबर एकाच व्यासपीठावर गाणं गात आहे. तिचा आवाज इतका गोड आहे की ट्विटर, फेसबुकवर याच चिमुरडीच्या व्हिडीओची चर्चा आहे. गुलाबी आणि काळ्या रंगाचा Cute फ्रॉक या मुलीने घातला असून त्यावर साजेसा हेअर बेल्ट देखील लावला आहे. वडिलांसोबतची या चिमुरडीची केमिस्ट्री पाहून नक्कीच उपस्थितांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं असणार आहे. रोजा (Roja) या सिनेमातील ‘दिल है छोटा सा (Dil Hai Chota Sa Choti Si Asha)’ हे गाणं या चिमुकलीच्या आवाजात ऐकायला आणखी गोड वाटत आहे. सोशल मीडियावर या 3 वर्षीय मुलीची आई मेघा अग्रवालने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या मुलीचे वडील गाणं गात असताना या तिने मध्येच त्यांना थांबवलं आणि स्वत: गाणं गाण्याचा हट्ट धरला. मग बालहट्टापुढे कुणी काहीच करू शकत नाही. वडिलांनी मुलीच्या इच्छेला मान देत तिला गाणं गाण्याची परवानगी दिली. यावेळी मुलीने संगीतकारांना साथ देत ‘दिल है छोटा सा…’ गायला सुरुवात केली. केवळ गाणं म्हणून ही चिमुरडी थांबली नाही आहे, आपल्या वडिलांसोबत डान्स देखील तिने केला आहे. तिच्या आईने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर लाखो युजर्सनी अनेकदा पाहिला आहे. 16 हजार लाईक्स आणि 3 हजार रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत.