मुंबई, 17 डिसेंबर : कोणतीही कला (Art) माणसाचं आयुष्य समृद्ध करत असते. एखाद्या विशिष्ट कलेमुळे संबंधित व्यक्तीला ओळख प्राप्त होते. कलेची जोपासना करताना कितीही अडथळे, समस्या आल्या, तरी त्यावर मात करण्याची त्या व्यक्तीची तयारी असते. कारण कलेच्या आविष्कारातून मिळणारं समाधान बहुमोल असतं. कलेला कोणत्याही गोष्टीचं बंधन नसतं. प्राप्त परिस्थितीतदेखील एखादा कलाकार कलेचा अविष्कार करू शकतो. आर्थिक, शारीरिक, सामाजिक अशा कोणत्याही गोष्टींचा अडथळा आला, तर दृढनिश्चयी कलाकार त्यावर मात करत पुढे जातो. इजिप्तमधल्या (Egypt) एसारा इस्माइल (Esraa Ismail) या प्रसिद्ध फोटोग्राफर महिलेची कहाणी काहीशी अशीच आहे. एसारा अंध आहे आणि तरीदेखील ती उत्तम फोटोग्राफर (Photographer) आहे. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल; पण हे खरं आहे. एखादं छायाचित्र टिपण्यासाठी लाइट, अँगल्स, कॅमेरा सेटिंग यांसारख्या बाबी पाहाव्या लागतात. हे सर्व नियम बाजूला ठेवत एसारा फोटोग्राफी करते. ती अंध (Blind) असली, तर तिचं कॅमेरा हाताळणीचं कौशल्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे तिने टिपलेलं प्रत्येक छायाचित्र चर्चेचा विषय ठरतं.
इजिप्तमधली प्रसिद्ध फोटोग्राफर एसारा इस्माइल तिच्या वैशिष्टपूर्ण फोटोग्राफीसाठी ओळखली जाते. अंध असूनही तिनं फोटोग्राफीची कला अत्यंत परिश्रमपूर्वक आत्मसात केली आहे. एसारा ही अंध फोटोग्राफर म्हणून जशी प्रसिद्ध आहे, तशीच ती अशी कामगिरी करणारी इजिप्तमधली पहिली महिला आहे. 22 वर्षांच्या एसारानं अलेक्झांड्रिया युनिव्हर्सिटीच्या आर्ट्स फॅकल्टीमधून अरबी भाषेत (Arab Language) शिक्षण पूर्ण केलं आहे. याच काळात तिला फोटोग्राफीविषयी कुतुहल वाटू लागलं; मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हेही वाचा : कायमस्वरुपी ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ‘एचआरए’मध्ये कपात होण्याची शक्यता
जगात एसारा इस्माइल ही एकमेव अंध फोटोग्राफर नाही. भारतात प्रणव लाल हे अंध फोटोग्राफर आहेत. तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचा वापर करून त्यांनी दृष्टीहिन व्यक्तींशी निगडित रूढीवादी विचारांना आव्हान दिलं आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर ते एक सर्वोत्तम फोटोग्राफर बनले. जर्मनीतली बर्लिनमधली (Berlin) सिलिया कॉर्न हीदेखील अंध फोटोग्राफर आहे. वयाच्या 12व्या वर्षी एका कार अपघातात तिच्या डोळ्यांना दुखापत झाली आणि तिची दृष्टी गेली. असं असूनदेखील तिचं कॅमेरा हाताळण्याचं कौशल्य अद्वितीय आहे.
एसारा इस्माइलची कहाणी काही वेगळी नाही. उत्तम फोटोग्राफर होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एसारानं सर्वप्रथम फोटोग्राफीतले बारकावे आत्मसात केले. त्यानंतर तिनं स्वतःची इमॅजिनेशन क्षमता (Imagination Power) अशा पद्धतीनं विकसित केली, की ती आता कोणत्याही ऑब्जेक्टचा फोटो अगदी सहजपणे क्लिक करू शकते. फोटो क्लिक करताना एसारा एक खास पद्धत अवलंबते. ती फोटो क्लिक करतेवेळी समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधते. त्या व्यक्तीचा आवाज ऐकत ती कॅमेराचा अॅंगल सेट करते. त्यानंतर त्या व्यक्तीपासून दोन मीटर अंतर दूर जाऊन ती फोटो क्लिक करण्यास सुरुवात करते. यासाठी ती कॅमेरातल्या ऑटो मोडचा (Auto mode) वापर करते. सुरुवातीच्या काळात फोटोग्राफी करताना एसाराला खूप अडचणी आल्या. फोटोचा दर्जा चांगला येत नव्हता. परंतु, कठोर परिश्रम करून तिनं हे कौशल्य आत्मसात केलं. तिनं काढलेली छायाचित्रं पाहून कोणाही व्यक्तीचा विश्वास बसत नाही, की इतकी सुंदर छायाचित्रं एका अंध महिलेनं काढली आहेत.