जो बायडेन
अमेरिकेला महासत्ता असं संबोधलं जातं. त्यामुळेच अमेरिकेचे अध्यक्ष ही जगातली सर्वांत प्रभावशाली व्यक्ती असते. या व्यक्तीच्या एका आदेशावरून शब्दशः इकडचं जग तिकडे होऊ शकतं. अशा या अमेरिकेच्या अध्यक्षपदावर सध्या असलेले जो बायडेन सध्या एका कारणामुळे चिंतेत आहेत. त्यासाठी कारणीभूत ठरला आहे तो त्यांचा पाळीव कुत्रा. या कुत्र्यामुळे बायडेन यांच्यासह त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडण्याइतकं नेमकं काय घडलंय, ते जाणून घेऊ या. ‘झी न्यूज’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जो बायडेन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कमांडर नावाचा एक जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा पाळला आहे. 2021 साली छोट्या पिल्लाच्या रूपात कमांडरने व्हाइट हाउसमध्ये प्रवेश केला. दिवसभराच्या कामाचा ताण हलका व्हावा नि विरंगुळ्याचे काही क्षण घालवता यावेत हा प्राणी पाळण्याचा एक हेतू असतो; मात्र या कमांडरने अनेकांना चावे घेऊन बायडेन कुटुंबीयांच्या चिंतेत भर घातली आहे. कमांडर अनेकांना चावला आहे, असं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिलं आहे. व्हाइट हाउसमध्येही त्याने अनेकांना चावा घेतला आहे. तसंच, व्हाइट हाउसच्या कर्मचाऱ्यांना तो चावल्याच्या किमान दोन तक्रारी आल्या आहेत. कमांडर आतापर्यंत किमान 10 जणांना चावला असून, आता त्याला नव्याने ट्रेनिंग दिलं जाणार आहे. एक व्यक्ती तर कमांडरच्या चाव्यामुळे गंभीर जखमी झाल्याने तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं होतं. सिक्रेट सर्व्हिस ई-मेलच्या हवाल्याने सीएनएन या वृत्तसंस्थेनेही या संदर्भात एक वृत्त दिलं आहे. कमांडर कुत्र्याने सिक्रेट सर्व्हिस मेंबरवर हल्ला केला आणि त्या वेळी जो बायडेन यांच्या पत्नी म्हणजेच फर्स्ट लेडी जिल बायडेन कमांडरला आवरू शकल्या नाहीत. व्हाइट हाउस ही कौटुंबिक पाळीव प्राण्यांसाठी अनोखी, मात्र खासकरून तणावपूर्ण माहौल असलेली जागा आहे, असं जिल बायडेन यांच्या प्रवक्त्याने सीएनएनशी बोलताना सांगितलं. ‘ताजमहाल आमच्या पूर्वजांच्या जमिनीवर बांधलेला आहे’ असं म्हणणाऱ्या दिया कुमारी कोण आहेत? प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांनी सांगितलं, ‘कमांडरमुळे उद्भवलेली परिस्थिती सुरळीत होण्यासाठी बायडेन कुटुंब प्रयत्न करत आहे. कमांडरला धावण्यासाठी, तसंच त्याच्या व्यायामासाठी वेगळी जागा तयार करण्याचं काम सुरू असून, त्याला आणखी ट्रेनिंगही दिलं जाणार आहे.’ सीमाचा खेळ अजून संपला नाही, प्रकरणाला आलं नवीन वळण, या प्रश्नाची देईल का उत्तरं? 2021मध्ये जेव्हा कमांडरने चावा घेतल्याची एक घटना घडली, त्यानंतर त्याला बायडेन परिवाराच्या डेलावेअरमधल्या घरी पुन्हा पाठवण्यात आलं होतं. तसंच आणखी प्रशिक्षणही देण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला कौटुंबिक मित्रांसह राहण्यासाठी पाठवण्यात आलं; मात्र त्या प्रशिक्षणाचा फारसा काही उपयोग झालेला नाही असं अलीकडच्या घटनांवरून दिसत आहे. त्यामुळे त्याला आणखी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळे तरी कमांडर काबूत येईल, अशी अपेक्षा आहे. बायडेन कुटुंबाकडे विलो नावाचं एक मांजरही आहे.