नवी दिल्ली, 11 जुलै : लोकशाहीतील समानतेच्या तत्त्वाऐवजी रुढीवादी आणि कट्टर विचारांचे लोक हे नेहमीच महिलांच्या प्रगतीआड येत असल्याचं दिसून येतं. पाकिस्तानमध्ये असाच एक प्रकार सध्या चर्चेत आला आहे. सात मुली (Seven girls) सर्जन झाल्याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट झाल्यानंतर कट्टर विचाराच्या नागरिकांनी (Conservative) मुलींसाठी ‘चूल आणि मूलच बरं’चा सूर आळवायला सुरुवात केली आहे. मात्र अनेक सुजाण पाकिस्तानी नागरिक या मुलींचं कौतुक करत असून त्यांच्या पाठिशी उभे आहेत. टीका कशामुळे? पाकिस्तानातील सुप्रसिद्ध डॉक्टर जावेद इकबाल यांनी एक फोटो ट्विट केला. कोण म्हणतं मुली सर्जन होऊ शकत नाहीत? मला सात मुलींना सर्जन केल्याचा अभिमान वाटतो, असं म्हणत त्यांनी या मुलींचा फोटो ट्विट केला. त्यावर नेटिझन्सकडून उलटसुलट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. काही रुढीवादी पाकिस्तानी नागरिकांना मुलींनी सर्जन होणं, ही गोष्ट काही पटली नाही. त्यामुळे त्यांनी टीका सुरू केली. मात्र बहुतांश नागरिकांनी या मुलींचं कौतुकच केलं. टीकाकारांचं म्हणणं काय? मुलींनी नेहमी एक आई आणि बहिण म्हणून राहावं, असं परंपरावादी पाकिस्तानींचं म्हणणं होतं. एकाने म्हटलं की या मुलींची दिशाभूल केली जात असून एक आई आणि बहिण म्हणून जगण्याचा त्यांचा अधिकार हिरावला जात आहे. तर काहींनी सर्जरी हे महिलांचं क्षेत्र नसल्याचीही टीका केली आहे. या मुलींच्या पेहरावावरही अऩेकांनी टीका करत त्यांना बुरखा वापरणंही शिकवायला हवं होतं, असं म्हटलं आहे. हे वाचा - कधीही भेट नाही, मात्र तरी 20 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या कैद्यासोबत थाटणार संसार समर्थकांचं म्हणणं काय? बहुतांश जणांनी या पोस्टला लाईक करत मुलींचं अभिनंदन केलं आहे. महिला त्यांना हव्या त्या क्षेत्रात करिअर करू शकतात. त्यामुळेच देशाची प्रगती होईल, असं एकानं म्हटलं आहे. तर एकानं डॉ. इकबाल यांचं अभिनंदन करत ते उत्तम काम करत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. अनेक महिलांना पुरुष डॉक्टरांकडे जायचं नसतं, मात्र महिला डॉक्टर नसल्यामुळे त्यांचा नाईलाज होतो, असं म्हणत एका युजरने या मुलींचं कौतुक केलं आहे.