काबुल, 7 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) नव्या तालिबान सरकारची घोषणा (Taliban government) करण्यात आली असून मोहम्मद हसन अखुंद (Mohammad Hasan Akhund) हे काउन्सिल हेड (Council Head) असणार आहेत. सरकारमधील अन्य पदाधिकाऱ्यांच्या नावची घोषणादेखील करण्यात आली आहे. तालिबानचे प्रवक्ते जैबीहुल्लाह मुजाहिद यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. असं असेल सरकारचं स्वरूप आतापर्यंत तालिबान सरकारबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. वेगवेगळ्या शक्यता चर्चिल्या जात होत्या. तालिबानचे जुने नेते अखुंदजादा हेच सरकारचे प्रमुख असतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र या सर्व शक्यता चुकीच्या ठरल्या असून मोहम्मद हसन अखुंद हे नव्या सरकारचं नेतृत्व करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे तालिबानचे सर्वोच्च नेते अखुंदजादा यांनीच अखुंद यांच्या नावाचा प्रस्ताव सरकारच्या प्रमुखपदासाठी ठेवला आणि इतरांनी तो एकमतानं मान्य केला, अशी माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. कोण आहेत मोहम्मद हसन अखुंद मोहम्मद हसन अखुंद यांना अखुंदजादा यांनी रईस-ए-जम्हूर, रईस-उल-वजारा अशी उपाधी दिली असून त्याचा अर्थ देशाच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तालिबानशी संबंधित एक मोठी संस्था असणाऱ्या रहबारी शूरा या परिषदेचे ते नेते आहेत. तालिबान चळवळीच्या संस्थापकांपेकी अखुंद एक आहेत. तालिबानचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कंदहारचे ते रहिवासी आहेत. हे वाचा - मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना आग्र्यातून अटक चर्चांना पूर्णविराम 15 ऑगस्ट रोजी तालिबाननं काबुलवर ताबा मिळवला होता. त्यानंतर लगेचच तालिबानकडून सरकारची घोषणा करण्यात येईल, असं सांगण्यात येत होतं. मात्र त्यानंतर अनेक कारणांमुळे सरकारची स्थापना होऊ शकली नाही. कधी अंतर्गत सत्तासंघर्षामुळे, तर कधी पंजशीर प्रश्नामुळे तालिबानच्या सरकार स्थापनेचा मुहूर्त पुढे जात होता. सरकार स्थापनेबाबतच्या अनेक शक्यताही समोर येत होत्या. मात्र आता तीन आठवड्यानंतर अखेर तालिबाननं आपल्या सरकारची अधिकृत घोषणा केली आहे. याला आंतरराष्ट्रीय समुदायातून काय प्रतिसाद येतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.