सीरियन महिलांसाठी भूकंप ठरला शाप
अतारेब (सीरिया), 14 फेब्रुवारी : सध्या सीरियातील महिलांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे. सीरियातील गृहयुद्धाच्या परिस्थितीमुळे आधीच अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या महिलांच्या समस्या नुकत्याच झालेल्या
भीषण भूकंपा
मुळे वाढल्या आहेत. आयशा आणि तिच्या 11 जणांच्या कुटुंबाने सात दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपात आपलं सर्वस्व गमावलं. रस्त्यावर आलेल्या या लोकांची व्यवस्था उत्तर-पश्चिम सीरियन शहर अतारेबमध्ये तंबूत केली आहे. अद्याप पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत गरजाही त्यांना मिळाल्या नाहीत. कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी आयशाला जड लोकरीच्या शालमध्ये गुंडाळावे लागत आहे. आंघोळ करण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी, तंबूपासून इमारतीत बांधलेल्या बाथरूमपर्यंत 15 मिनिटे चालत जावे लागते. त्यांच्या आजूबाजूला हे एकमेव ठिकाण आहे. आयशा तिची परिस्थितीबद्दल म्हणाली, ‘जेव्हा मी माझे घर पाहते तेव्हा मला वाटते की कोणी जिवंत कसे बाहेर आले? कदाचित मी मेले असते तर बरे झाले असते. त्या ढिगाऱ्याखालून जगाचा ढिगारा खांद्यावर घेऊन मी बाहेर आले.’’ आयशाला तिला आणि इतर सीरियन लोकांना आणखी किती त्रास सहन करावा लागेल याची कल्पना नाही. गेल्या 12 वर्षांपासून देशात सुरू असलेल्या गृहयुद्धात विखुरलेल्या कुटुंबांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी विशेषत: महिलांच्या खांद्यावर आली आहे.
गृहयुद्धामुळे अर्थव्यवस्था कमकुवत सीरियातील गृहयुद्ध आणि कमकुवत अर्थव्यवस्थेमुळे लाखो लोक आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहेत. 6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपात 35,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बाधित शहरे पूर्णपणे उजाड झाली आहेत आणि काँक्रीटच्या ढिगाऱ्यात बदलली आहेत. भूकंपग्रस्तांनी अनेक रुग्णालये भरल्यामुळे आयशाला तिच्या यकृताच्या आजारावर उपचार आणि तपासणीसाठी वैद्यकीय सेवा मिळू शकत नाही. आयशा आणि तिचा पती या दोघांनीही भूकंपात उत्पन्नाचे स्रोत गमावले आहेत. आयेशाच्या पतीच्या टॅक्सीचे नुकसान झाले आहे, तर आयशा विकत असलेल्या कपड्यांचे दुकानही उद्ध्वस्त झाले आहे.
आयशा आणि तिच्या पतीकडे त्यांच्या 6 मुलांना आणि 5 नातवंडांना मूलभूत सुविधा देण्यासाठी काहीही नाही. या नातवंडांमध्ये गृहयुद्धात मरण पावलेल्या त्यांच्या एका मुलाच्या दोन मुलांचाही समावेश आहे. ‘जर अडचणी हे देवाच्या प्रेमाचे प्रतीक असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की देव सर्व सीरियन लोकांवर प्रेम करतो’, असे आयशा डोळ्यात अश्रू आणत म्हणाली. पुराणमतवादी समाजातील बहुतेक महिलांप्रमाणे आयशानेही नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. सीरियातील एकमेव बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या अत्रेबमधील छावणीत त्यांचा तंबू आहे.