मेक्सिको सिटी, 11 नोव्हेंबर : मेक्सिकोमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुआनाजुआटो या राज्यात बारमध्ये झालेल्या गोळीबारात 9 जण ठार तर 2 जखमी झाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. रॉयटर्सने अधिकार्यांच्या हवाल्याने सांगितले की, बुधवारी रात्री 9 वाजता (स्थानिक वेळेनुसार) सेलियाच्या बाहेरील अपासिओ एल अल्टो शहरातील एका बारमध्ये एक गट शस्त्रांसह आला आणि त्या गटाने तेथे उपस्थित लोकांवर गोळीबार केला. गुआनाजुआटोमधील पोलिसांनी एका निवेदनात म्हटले की, गोळीबारात पाच पुरुष आणि चार महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन अन्य महिला जखमी झाल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेनंतर राज्य आणि फेडरल अधिकारी तसेच नॅशनल गार्डची पथके या भागात पाठवण्यात आले आहेत. मेक्सिकोचे औद्योगिक केंद्र गुआनाजुआटो हे, अलीकडच्या काही वर्षांत कार्टेलमधील टर्फ युद्धांमुळे गंभीरपणे प्रभावित झाले आहे. गेल्या महिन्यात इरापुआटो शहरातील एका बारमध्ये झालेल्या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच गेल्या सप्टेंबरमध्ये याच शहराजवळ झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. हेही वाचा - हा तर अन्याय! अमेरिकेपेक्षा भारतीयांना Blue tick साठी मोजावे लागणार जास्त पैसे एबीसी न्यूजच्या अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत गुआनाजुआटोमध्ये किमान गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. याठिकाणी एक स्थानिक टोळी जॅलिस्को कार्टेलशी युद्ध करत आहे. या सर्व हल्ल्यांमध्ये साम्य म्हणजे हल्लेखोरांनी बारमधील वेट्रेससह सर्वांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. अपासिओ एल अल्टो शहरात बुधवारी रात्री झालेल्या हल्ल्यात, हल्लेखोरांनी बारच्या रक्ताने भिजलेल्या मजल्यावर हाताने लिहिलेले पोस्टर सोडले. संदेशांवर सांता रोसा डी लिमा टोळीने स्वाक्षरी केली होती. यांचा नेता ‘मॅरो’ किंवा स्लेजहॅमर म्हणून ओळखला जातो आणि सध्या तो तुरुंगात आहे.