कीव्ह, 1 मार्च : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. रशिया आता प्रचंड आक्रमक होताना दिसत आहे. रशियाने युक्रेनच्या दिशेला अनेक मिसाईल्सचा मारा केला आहे. या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशिया युक्रेनवर ताबा मिळवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी रशियन सैन्य आता युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ह (Kyiv) शहराच्या दिशेला कूच करत आहेत. रशियन सैन्याचे याबाबतचे काही फोटो देखील समोर आले आहेत. आतापर्यंतच्या सर्व घडामोडी पाहता रशियाचे हजारो सैनिक आता कधीही कीव्हमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. ते कदाचित कीव्हला चारही बाजूंनी वेढा घालण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. यावेळी युक्रेनच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले युक्रेनच्या सैनिकांसोबत मोठी चकमक होण्याची शक्यता आहे. कदाचित तिथे युद्धाचा मोठा भडका उडणार असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. रशियन सैन्याचा ताफा 64 किमीने व्यापलेला रशियन सैन्याचा प्रचंड मोठा ताफा कीव्हच्या दिशेला चालून जात आहे. हा ताफा जवळपास 40 मैल लांब असा एकूण 64 किमीने व्यापलेला आहे. हा ताफा कालपर्यंत 17 मैल इतका लांब होता. पण आज तोच ताफा तब्बल 40 मैल लांब इतका पसरला आहे. संपूर्ण ताफा युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ह शहराच्या दिशेला चालून जात आहे. अमेरिकेच्या एका खासगी सॅटेलाईट कंपनीने याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याआधीच कीव्ह शहरास वेढा घालण्याची आणि युद्ध होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता रशियन सैन्याच्या ताफ्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. ( नवाब मलिकांची सुटका की पुन्हा कोठडी? उद्या कोर्टात महत्त्वाची सुनावणी ) अमेरिकेच्या मॅक्सर टेक्नॉलॉजीज या खाजगी अमेरिकन उपग्रह कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. युक्रेनच्या सीमेच्या उत्तरेस 20 मैलांवर असलेल्या दक्षिण बेलारुसमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आल्याचं तसेच ग्राउंड अटॅक हेलिकॉप्टर युनिट्स सॅटेलाईटमध्ये कैद झालं आहे. रशियना सैन्याचा ताफा हा एंटोनोव एअरबेसपासून (कीवच्या सिटी सेंटरपासून अवघ्या 17 मैल अंतरापासून) ते प्रिबिर्स्क शहरापर्यंत पसरलेला आहे. प्रिबिर्स्क हे शहर युक्रेन-बेलारुस सीमेजवळ आहे, अशी माहिती या खासगी उपग्रह कंपनीने दिलेली आहे. भारतीय दुतावासाचे भारतीयांना कीव्ह सोडण्याची सूचना मिळालेल्या माहितीनुसार, रशियन सैन्य आता कधीही कीव्ह शहराला वेढा घालू शकते. रशियाचे 75 टक्के सैन्य आता युक्रेनच्या भूमीत दाखल झाले आहेत. रशियन सैन्याचा इतका मोठा ताफा आहे की तो ताफा सॅटेलाईटमध्ये पूर्णपणे कैद होऊ शकला नाही. दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कीव्हमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना आज तातडीने कीव्ह सोडण्याचा सल्ला दिला (Indian Nationals Advised to Leave Kyiv) आहे. दूतावासाने यासंदर्भात सूचना देणारं ट्विट केलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना कीवमधून निघून जाण्यास सांगण्यात आलं आहे. शक्यतो उपलब्ध गाड्यांद्वारे किंवा उपलब्ध इतर कोणत्याही वाहनांद्वारे तात्काळ कीव्ह सोडा, असा सल्ला दूतावासाने दिला आहे. कीव्हमधील हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना या सूचना देण्यात आल्या आहेत.