रोहिणी घावरी
नवी दिल्ली, 25 मार्च: सरकारी शिष्यवृत्ती मिळवून स्वीत्झर्लंडमध्ये पीएचडी करणाऱ्या एका सफाई कामगाराच्या मुलीने जिनिव्हात मानवधिकार परिषदेत भारताचे कौतुक केले. इंदौरमधील एका सफाई कामगाराची मुलगी असलेल्या रोहिणी घावरीने मानवाधिकार परिषेदच्या ५२ व्या अधिवेशनात उपेक्षित लोकांना पुढे नेल्याबद्दल देशाचं कौतुक केलंय. रोहिणी घावरीने म्हटलं की, संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत सहभागी होण्याची मला संधी मिळाली. मी दोन वर्षांपासून जिनिव्हात पीएचडी करतेय. संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व करणं आणि भारतातील दलितांच्या स्थितीबद्दल जनजागृती करण्याचं माझं स्वप्न होतं. दलित समाजामधून अशा ठिकाणी पोहोचण्याची संधी मिळणं कठीण असल्याचंही रोहिणीने म्हटलं. रोहिणी घावरीने म्हटलं की, दलित मुलगी असल्यानं मला इथं येऊन बोलण्याची संधी मिळालीय याचा अभिमान आहे. भारतातल्या दलितांची स्थिती ही पाकिस्तानसारख्या शेजारी देशांपेक्षा खूप चांगली आहे. भारतात आमच्याकडे आरक्षण आहे. तसंच मला भारताकडून एक कोटी रुपयांची शिष्यवृत्तीही मिळालीय. एका सफाई कामगाराची मुलगी असून इथंपर्यंत पोहोचलो आहे हेच खूप मोठं आहे. पाकिस्तान सातत्याने भारतातील अल्पसंख्यांक, दलित अन् आदिवासी अशा समुदायांसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करत असते. भारतात मोठा बदल झाला असून देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी समुदयातील द्रौपदी मुर्मू आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना दलितांच्या स्थितीत मोठे बदल झाल्याचं दिसून येतयं. उपेक्षित वर्गातले लोक उच्च पदी असण्याचं प्रमाण जास्त नसलं तरी देशाची घटना खूप भक्कम अशी आहे. उपेक्षित समाजातील प्रत्येक सदस्याला पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होण्याचं स्वप्न पाहण्याची संधी राज्यघटना देते. प्रत्येकजण हॉर्वर्ड किंवा ऑक्सफर्डला जाऊ शकतो आणि असे बदल भारतात बघायला मिळतायत.