नवी दिल्ली 24 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या (National Day of Pakistan) निमित्तानं शेजारी देशाचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan’s PM Imran Khan) यांना शुभेच्छा संदेश पाठवला होता. मागील बऱ्याच काळापासून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणापूर्ण संबंधांदरम्यान हे एक महत्त्वाचं पाऊल समजलं जात आहे. अशात आता पंतप्रधान मोदींच्या या पत्रावर (Modi Writes Letter to Pakistan PM) पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. इम्रान सरकारमध्ये मंत्री असलेल्या असद उमर यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींच्या या पाऊलाचं स्वागत केलं आहे. असद उमर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, की पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे पाठवण्यात आलेला 23 मार्चचा संदेश हे एक चांगलं पाऊल आहे. पंतप्रधान झाल्यापासूनच इम्रान खान शांतीच्या मार्गाला पाठिंबा देण्याचा आणि सर्व शेजाऱ्यांसोबत शांती कायम ठेवण्याचं आवाहन करत आहेत.
पाकिस्ताननं 23 मार्चला आपला राष्ट्रीय दिवस साजरा केला. याच निमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी इम्रान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, भारताला आपल्या शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध बनवायचे आहेत. मात्र, या मैत्रीत दहशतवादाला काहीही जागा नाही. दहशतवादमुक्त वातावरण तयार करणं खूप गरजेचं आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्ताननं भारताबद्दल अनेक वक्तव्य केली आहेत, ज्यातून ते भारतासोबत शांततेचा संकेत देत आहेत. नुकतंच पाकिस्तान सेनेचे प्रमुख कमर बाजवा यांनी म्हटलं, की पाकिस्तान भारतासोबत जुन्या गोष्टी विसरुन चांगलं नातं बनवू इच्छित आहे. पंतप्रधानांबद्दल बोलायचं झाल्यास इमरान खान यांना 20 मार्चला कोरोनाची लागण झाली तेव्हा मोदींनी ट्वीट करत ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही केली होती.