नवी दिल्ली, 26 मे: पीएनबी घोटाळ्यातील (PNB bank scam) आरोपी असलेला आणि भारतातून पसार झालेला मेहुल चोक्सी (Mehul Choksi) हा तीन दिवसांपूर्वी मध्य अमेरिकेतील अँटिग्वा **(Antigua)**मधून बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण आता मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याचा ठावठिकाणा लागल्याची माहिती समोर आली आहे. अँटिग्वामधून बेपत्ता झालेला मेहुल चोक्सी हा शेजारील डोमिनिका (Dominica) देशात सापडला असून त्याला डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (Criminal Investigation Department) ताब्यात घेतले आहे. असं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. तीन दिवसांपूर्वी तो अँटिग्वामधून गायब झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. अँटिग्वामधून क्युबा येथे पसार झाल्याचं वृत्तही समोर आलं होतं. मात्र, आता डोमिनिकाच्या सीआयडीने त्याला ताब्यात घेतलं आहे.
PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही गायब, तीन दिवसांपासून तपास सुरू PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेसोबत 13 हजार कोटींहून अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा केल्यानंतर दोघांनीही परदेशात पळ काढला आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणी मेहुल चोक्सी याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांना भारतात आणण्यासाठी भारतीय तपास यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याची आतापर्यंत 14 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. तर नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाचाही मार्ग आता मोकळा झाला आहे. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला युनायटेड किंगडमच्या गृहमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बॅकेला तब्बल 13 हजार 570 कोटी रुपयांचा चुना लावला आहे.