वॉश्गिंटन, 24 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Vice President Kamala Harris)यांची भेट घेतली. भारतीय वंशाच्या अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांनी भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची प्रत्यक्ष भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्हाईट हाऊसमध्ये (White House) झालेल्या या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हॅरिस यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं आहे.
उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी पंतप्रधानांचे स्वागत करून आनंद झाल्याचं म्हटलं आहे. हॅरिस म्हणाल्या की, भारताच्या पंतप्रधानांचे स्वागत करुन मला खूप आनंद झाला आहे. त्याचवेळी या संभाषणात, पीएम मोदींनी कमला हॅरिस यांचं खूप कौतुक केलं. पीएम मोदी म्हणाले की, कमला हॅरिस संपूर्ण जगासाठी एक प्रेरणा आहे. मोदी म्हणाले की, जर तुम्ही भारत (India)दौऱ्यावर आलात तर संपूर्ण देश खूप आनंदी होईल.
ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार पीएम मोदी म्हणाले, ‘अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुमची निवड हा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक प्रसंग होता. तुम्ही जगभरातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहात. मला विश्वास आहे की राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि तुमच्या नेतृत्वाखाली आमचे द्विपक्षीय संबंध नवीन उंची गाठतील.
मोदी पुढे म्हणाले, तुमच्या विजयाचा प्रवास सुरू ठेवून, भारतीय देखील ते भारतात सुरू ठेवतील आणि तुम्ही भारतात येण्याची वाट पाहू, म्हणून मी तुम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो. कमला हॅरिस यांनी यावर भर देत म्हटलं की, भारत आणि अमेरिकेसोबत काम केल्यानं दोन्ही देशांच्या लोकांवरच नव्हे तर जगावर खोल परिणाम होईल. त्यांनी कोविड -19सह अनेक मुद्द्यांवरील दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सहकार्याचा उल्लेख करण्यात आला.