मुंबई, 28 फेब्रुवारी: रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धानं अवघ्या जगाची चिंता वाढवली आहे. या दोन देशांमधील संघर्ष आता कुठपर्यंत जातो हे सध्यातरी सांगता येणं कठीण आहे. मात्र जगातील शक्तीशाली देश असलेल्या रशिया समोर युक्रेनचा निभाव लागेल का असा प्रश्न चार दिवसांपूर्वी अनेकांना होता. मात्र चार दिवसांनंतरही रशियाला युक्रेनच्या राजधानीवर ताबा मिळवता आलेला नाही. देशाची राजधानी शत्रूंच्या ताब्यात जाण्यापासून रोखण्यासाठी युक्रेनचे सैनिक मोठ्या धैर्यानं लढत आहेत. देशावर आलेल्या संकटाला घाबरून पळून जाण्याऐवजी अनेक युक्रेन नागरिकांनी हातात बंदुका घेतल्या आहेत. ते आपला जीव धोक्यात घालून जगातील बलाढ्य सैन्यांशी दोन हात करत आहेत. रशियन सैन्यांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचे अनेक व्हिडीओ यापूर्वी समोर आले आहेत. असं असताना आता एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये काही नागरिकांनी रशियन रणगाड्यांना घेराव करत त्यांना रोखलं आहे. तसेच परत जाण्याबाबत घोषणा दिल्याची माहितीही समोर येत आहे. हेही वाचा- युक्रेनमध्ये भारतीयांची दयनीय अवस्था, -7 डिग्रीत पायी पोहोचले सीमेवर अन्… एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनियन नागरिकांनी रशियन रणगाड्यांचा मार्ग अडवला आहे. रशियन रणगाडे किव्हच्या दिशेनं मार्गक्रमण करत होते. दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी त्यांना रोखलं आहे. रशियन सैनिकांनी मार्ग विचारण्यासाठी आपला रणगाड्यांचा ताफा रोखला होता. यावेळी अनेक नागरिकांनी रणगाड्यांना घेराव घातला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका रशियन रणगाड्याने रस्त्यावरून जाणाऱ्या कारला चिरडलं होतं. ही क्रूरतेची परिसीमा गाठणारी घटना ताजी असताना, युक्रेनियन नागरिकांनी रशियन रणगाडे रोखण्याची हिंमत केली आहे. युक्रेनमधील कोर्युकिव्हकाच्या बाहेरील भागात स्थानिक नागरिक रशियन सैनिकांच्या हालचाली रोखत आहेत.