नवी दिल्ली, 31 मार्च : पाकिस्तानवर राजकीय संकट घोंघावत आहे. चारही बाजूंनी वेढलं गेलेलं पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी आता नवी चाल खेळली आहे. त्यांनी संसद (pakistan national assembly) बरखास्त करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. असं करून त्यांना अविश्वासाचा ठराव टाळायचा आहे. विरोधकांना फ्लोअर टेस्ट हवी असली तरी सरकार स्थापनेसाठी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. मात्र, इम्रान खान यांनी नवी खेळी करून परिस्थिती आणखीनच गडद केली आहे. काही वेळातच पाकिस्तानच्या संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्ताव मागे घेतल्यास नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचा ठराव पास करू, असा प्रस्ताव विरोधकांना दिला आहे. मात्र, विरोधक इम्रान खानची ऑफर स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. कारण आपल्याकडे 177 सदस्यांचं बहुमत असल्याचा विरोधकांचा दावा आहे. इम्रान राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेणार पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये आजपासून इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे. नॅशनल असेंब्लीच्या सचिवालयानं बुधवारी रात्री उशिरा यासंदर्भातील नोटीस जारी केली. दरम्यान, इम्रान खान यांच्याशी संबंधित दोन मोठ्या बातम्या येत आहेत. एक, इम्रान खान आज राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेणार आहेत आणि दुसरं म्हणजे ते आज देशाला संबोधित करणार आहेत. इम्रान खान यांनी काल देशाला संबोधित करण्याची योजना आखली होती. परंतु, लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांची भेट घेतल्यानंतर ती पुढे ढकलण्यात आली. जिओ टीव्हीनुसार, इम्रान खान रात्री उशिरा पाकिस्तानी जनतेला संबोधित करणार आहेत. गेल्या एक महिन्यापासून संसदेमध्ये इम्रान खान सरकार धोक्यात आलं आहे.