लंडन 21 मे : ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांना मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. याकाळात जेनी मॅक्गी नावाच्या महिला नर्सनं त्यांची काळजी घेतली होती. अतिदक्षता विभागात रुग्णांची काळजी घेणाऱ्या या नर्सनं (Nurse) आता या महामारीविरोधात लढण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत खंत व्यक्त करत राजीनामा (Resigned) दिला आहे. सोबतच त्यांनी असंही म्हटलं आहे, की नर्सला त्यांच्या कामाप्रमाणं पगार आणि आदरही मिळत नाही. मूळच्या न्यूझीलंडच्या असलेल्या जेनी मॅक्गी म्हणाल्या, की या महामारीमुळे ब्रिटेनमध्ये 1,20,000 हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे आणि हे वर्ष त्यांच्या करिअरमधील सगळ्यात कठीण वर्ष सिद्ध झालं आहे. द इअर ब्रिटेन स्टॉप्ड नावाच्या चॅनेल ४ च्या डॉक्युमेंटरीमध्ये त्या म्हणाल्या, की आम्ही आमचा जीव धोक्यात घालून खूप मेहनत केली. आमच्याबद्दल खूप कौतुकही झालं, अनेकांनी आम्हाला हिरो म्हटलं. मात्र, मला नाही वाटत की मी हे करु शकते. मला नाही माहिती, की मी राष्ट्रीय आरोग्य सेवेत (एनएचएस) किती योगदान देऊ शकते. मॅक्गीनं म्हटलं, की आम्हाला तो पगार आणि आदर मिळत नाही, ज्यासाठी आम्ही पात्र आहोत. याच गोष्टीमुळे मी राजीनामा देत आहे. सरकारनं यंदा एनएचएस कर्मचाऱ्यांच्या वेतनात एक टक्का वाढीचा प्रस्ताव दिला आहे. मॅक्गी म्हणाल्या, की अनेक नर्सचं असं म्हणणं आहे, की महामारीसोबत लढण्यासाठी सरकारनं प्रभावी पाऊलं उचलली नाहीत. ब्रिटेनमध्ये कोरोना वायरसचे आतापर्यंत 4,468,366 रुग्ण आढळले आहेत. तर, 127,956 लोकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्सन यांनाही मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. सेंट थॉमस रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी मॅक्गी आणि एक नर्स लुइस पिटर्मा यांनी केलेल्या देखभालीबद्दल त्यांचं कौतुक केलं होतं.