Yellow Submarine for Party : पाणबुडी म्हटल्यानंतर आपल्या मनात फक्त युद्धाचा आणि शत्रूंशी लढाईचा विचार येतो. मात्र, आता ही समजूत बदलावी लागणार आहे. कारण अशी पाणबुडी बनवण्यात आली आहे, जी पार्टी आणि कार्यक्रमांसाठी (Underwater Party Celebration) वापरता येईल. नेदरलँड्सच्या U-Boat Worx या कंपनीने ही पाणबुडी तयार केली आहे. पाणबुडीचा वापर 120 लोकांच्या पार्टीसाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी देखील केला जाऊ शकतो.
ही एक पिवळ्या रंगाची पाणबुडी आहे आणि ती केवळ विवाहसोहळा आणि इतर उत्सवांसह कॅसिनो आणि डिनरसाठी देखील वापरली जाऊ शकते. डेली स्टारच्या वृत्तानुसार, ही पाणबुडी बॅटरीवर चालणार असून त्यामध्ये इतर अनेक सुविधा देण्यात येणार आहेत.
पाणबुडीच्या आत एक लग्नमंडप तयार केला आहे. इथे विवाह होऊ शकतात. 64 लोकांसाठी एक रेस्टॉरंट असेल आणि जिमसह कॅसिनोची सुविधा असेल. पाणबुडीच्या आतील क्षेत्र 1600 स्क्वेअर फूट असून ते अतिशय आलिशान पद्धतीने सजवण्यात आले आहे. पार्टीदरम्यान लोकांना समुद्राबाहेरचं दृश्य पाहता येणार आहे.
पाणबुडीची बॅटरी इतक्या क्षमतेची आहे की, 24 तास सतत पार्टी करूनही ती संपणार नाही. याद्वारे लोकांना चैनीचा अनुभव देता येईल. पाणबुडीची लांबी 115 फूट असून ती 650 फूट खोल जाऊ शकते. पाणबुडीच्या आत 14 मोठ्या खिडक्या आहेत, ज्यातून पुरेसा प्रकाश येऊ शकतो. इथे व्यायामही करता येईल आणि आरामात जेवणही करता येईल.
कंपनीचे सीईओ बर्ट हॉटमन यांच्या मते, पाण्याखालील इव्हेंटसाठी या पाणबुडीचा वापर करायला लोकांना आवडेल. येथे येणारे लोक क्रूझप्रमाणे पाणबुडीत फिरू शकतात. जोपर्यंत ती पाण्याबाहेर आहे, तोवर तिच्या छतावर उभं राहून समुद्राचं दृश्य पाहता येतं. येथे एक सनलाईट झोनदेखील असेल, जिथे वरून प्रकाश येऊ शकेल.
पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी (आदरातिथ्य) उद्योगातील हा पूर्णपणे नवा प्रयोग आहे, जो लवकरच लोकांसाठी उपलब्ध होणार आहे. एकीकडे आकाशात हॉटेल सुरू करण्याच्या संकल्पनेवर काम सुरू असताना आता खोल समुद्रात पार्टीची सोय करणाऱ्या या पाणबुडीमुळे आलिशान जीवनाचा नवा अनुभव मिळणार आहे. इथे येणाऱ्या लोकांसाठी हा एक पूर्णपणे वेगळा आणि नवीन अनुभव असेल. (क्रेडिट- U-Boat Worx)