नवी दिल्ली, 26 जुलै: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा (New variant) सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत असल्याचं इंडोनेशियातील (Indonesia) स्थितीवरून दिसून येत आहे. इंडोनेशियात गेल्या एका आठवड्यात 100 पेक्षा जास्त लहान मुलांचा (More than 100) कोरोनानं बळी घेतला आहे. यातील बहुतांश मुलं ही 5 वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाचा उद्रेक इंडोनेशियात सध्या कोरोनाची लाट सुरू असून शुक्रवारच्या एकाच दिवसात 50 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत, 1566 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आढळणाऱ्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 12.5 टक्के लहान मुलं असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण वाढलं असून लहान मुलांची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. 12 जुलैच्या आठवड्यात 150 पेक्षा अधिक मुलांचा कोरोनामुळे बळी गेला होता. आतापर्यंत इंडोनेशियात 3 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले असून 83 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. लहान मुलांवर संकट इंडोनेशियात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 800 पेक्षाही अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. 18 वर्षांखालील मुलांची ही आकडेवारी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. सध्या इंडोनेशियातील तमाम रुग्णालयं भरली असून अनेक रुग्णांना खाटाही मिळत नसल्याचं चित्र आहे. एकूण कोरोना बाधितांपैकी दोन तृतीयांश जनता ही घरीच विलगीकरणात राहत असल्यामुळे लहान मुलांना लागण होण्याची शक्यता बळावत चालली आहे. हे वाचा - पुण्यात कंपाऊंडरला लोखंडी रॉडने मारहाण; इंजेक्शनसह 13 हजार रुपयांचा ऐवज लंपास भीती ठरतेय खरी कोरोनाचा नवा व्हेरियंट लहान मुलांसाठी घातक ठरू शकतो, असा अंदाज काही महिन्यांपूर्वीच विविध शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेत अनेक तरूण कोरोनाला बळी पडल्याचं चित्र होतं. त्यानुसार तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. इंडोनेशियातील स्थिती पाहता, हा अंदाज खरा ठरत असल्याचं चित्र आहे.