वॉशिंग्टन, 18 मार्च : अमेरिकेन गुप्तचर संस्थेच्या रिपोर्टनंतर (US Intelligence Report) रशियात खळबळ उडाली आहे. रशियाने अमेरिकेतील आपल्या राजदूताला माघारी बोलवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायेडन (Joe Biden) यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांना बुधवारी खुनी म्हंटले होते. त्याचबरोबर ‘पुतीनला याची किंमत मोजावी लागेल,’ असा इशारा देखील दिला होता. त्यानंतर रशियानं राजदूत माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. बायडेन यांनी इशारा का दिला? एबीसी न्यूजला बायडेन यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या रिपोर्टवर प्रश्न विचारण्यात आला होता. ‘पुतीन यांनी बायडेन यांच्या विरोधात ट्रम्प यांना निवडणूक प्रचारात मदत केली होती,’ असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. बायडेन यांनी त्यावर ‘त्यांना किंमत मोजावी लागेल’ असा इशारा दिला. पुतीन यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्या अॅलेक्सी नॅव्हेली यांना विष दिल्याचा देखील आरोप आहे. त्या विषयावर ‘पुतीन यांना तुम्ही खुनी मानता का?’ असा प्रश्न बायडेन यांना विचारण्यात आला होता.त्यावर त्यांनी ‘होय’ असे उत्तर दिले. नॅव्हेली यांना विष दिल्याबद्दल शिक्षा म्हणून अमेरिकेच्या वाणिज्य विभागानं रशियावरील निर्यात बंदी आणखी कठोर केली आहे. त्यानंतर रशियानं अमेरिकेतील राजदूला मॉस्कोमध्ये परत बोलवण्याचा निर्णय घेतला. ‘यावेळी दोन्ही देशांमधील संबंध खराब करण्याची आपली इच्छा नाही. रशियन राजदूला चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे,’ असे रशियाच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे. ( Explainer : चीनवर घोंघावतंय का घोंघावतंय पिवळं विनाशकारी वादळ? ) ‘अमेरिकेतील संबंधांच्या स्वरुपावर यापुढे काय केले पाहिजे याचे विश्लेषण करण्यासाठी रशियाच्या राजदूला माघारी बोलवण्यात आले आहे. अमेरिका-रशिया संबंध आणखी बिघडले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही अमेरिकेची असेल,’ असे रशियाचे उपपराष्ट्र मंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी स्पष्ट केले आहे.