इस्लामाबाद, 15 जुलै: पाकिस्तानमध्ये (Pakistan) बळजबरीनं होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी वयाची 18 वर्ष (18 years) पूर्ण होईपर्यंत धर्म न बदलण्याच्या पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांच्या प्रस्तावाला पाकिस्तानमधूनच (Pakistan) विरोध सुरू झाला आहे. धर्म बदलणं (Religion) हा प्रत्येकाच्या इच्छेचा आणि स्वातंत्र्याचा भाग असून त्याला वयाची अट घालणं (Age restriction) योग्य नाही, अशी भूमिका धार्मिक खात्याचे मंत्री नुरुल हक कादरी (Nurul haq kadri) यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानमधील या प्रस्तावित कायद्याला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आहे. काय आहे प्रस्ताव? पाकिस्तानातील वेगवेगळ्या भागात जबरदस्तीनं अल्पसंख्याक समाजातील मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यात येतंय. विशेषतः हिंदूंचं अधिक प्रमाण असलेल्या सिंध प्रांतात हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजाच्या धर्मपरिवर्तनाचं प्रमाण अधिक आहे. याला आळा घालण्यासाठी सज्ञान होईपर्यंत धर्मांतराला परवानगीच न देणारा कायदा करण्याची तयारी पाकिस्तान सरकारनं केली आहे. मात्र त्याला कट्टरतावाद्यांकडून तीव्र विरोध होत आहे. विरोधाचे मुद्दे कुठला धर्म स्विकारायचा, हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असून सरकारनं त्यात लुडबूड करणं योग्य नाही, असं कादरी यांनी म्हटलं आहे. याबाबत नेमण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत कादरी यांनी असे कायदे वस्तुस्थितीचा विचार न करता तयार करण्यात आल्याचं सांगितलं आहे. यापूर्वीदेखील 18 वर्षांआतील अनेक व्यक्तींची धर्मांतरं झाली असून त्यातून कुठलेही अडथळे निर्माण झाले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे वाचा - अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानचं वर्चस्व! नवे नियम मोडलात तर होणार शिक्षा सक्तीच्या धर्मांतराची चौकशी सक्तीच्या धर्मांतराची चौकशी केली जाईल. अशी धर्मांतरं होत असतील, तर हे पाकिस्तानचं आणि इस्लामचं नुकसान असून या प्रकारांना आळा घातला पाहिजे, अशी प्रतिक्रिया कादरी यांनी दिली आहे. मात्र काही ठिकाणी असे गैरप्रकार होतात, यासाठी कायदा करून लोकांना धर्मांतरण करण्यापासून रोखणं हे चुकीचं असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. आता पंतप्रधान इम्रान खान विरुद्ध धार्मिक विषयांचे मंत्री कादरी असे दोन गट निर्माण झाले असून पाकिस्तानील पुरोगामी विचारांच्या नागरिकांनी इम्रान खान यांच्या कल्पनेला पाठिंबा दिला आहे.