न्यूयॉर्क, 2 सप्टेंबर: अमेरिकेत सध्या इडा (Ida Hurricane) नावाच्या चक्रीवादळाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक राज्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं असून, जीवित व वित्त हानीही झाली आहे. रविवारी (29 ऑगस्ट) सुरू झालेल्या इडा या चक्रीवादळाचे परिणाम अजूनही दिसत आहेत. न्यूयॉर्क (New York) आणि न्यू जर्सीसह (Ney Jersey) अनेक राज्यांमध्ये या चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे. एका तासात 3.24 इंच पाऊस झाल्यामुळे न्यू जर्सीच्या नेवार्क लिबर्टी (Newark Liberty Airport) विमानतळावर पाणी भरलं. त्यामुळे तिथून होणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली. काही काळाने परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर काही अत्यावश्यक विमानसेवा सुरू करण्यात आल्या.
न्यूयॉर्क शहरातल्या सात जणांचा, तर न्यू जर्सी राज्यातल्या एकाचा आतापर्यंत या चक्रीवादळामुळे मृत्यू झाला आहे. या दोन्ही राज्यांत इमर्जन्सी (Emergency) अर्थात आणीबाणीची परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. बुधवारी (एक सप्टेंबर) पेनसिल्व्हानियामधल्या एक लाख, तर न्यू जर्सीमधल्या 50 हजार घरांमधला वीजपुरवठा खंडित झाला होता. न्यूयॉर्कची सब वे लाइन आणि न्यू जर्सीची 18 ट्रांझिट रेल्वे सेवा थांबवण्यात आली आहे. रस्त्यांवरही केवळ आपत्कालीन परिस्थिती निवारण कार्यक्रमाशी संबंधित वाहनांनाच फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. फिलाडेल्फिया आणि न्यू जर्सीच्या उत्तरेकडच्या भागात प्रचंड पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. लसीलाही न जुमानणाऱ्या Mu व्हेरिएंटनं वाढवली जगाची चिंता, WHO नं दिला गंभीर इशारा न्यू जर्सीमधल्या मुलिका हिल इथल्या नऊ घरांची पूर्ण वाताहत झाली. रस्त्यांची परिस्थितीही अत्यंत बिकट झाली आहे. न्यू जर्सीमधल्या पॅसिक शहराचे महापौर हेक्टर लोरा यांनी सीएनएनला सांगितलं, की त्यांच्यासमोर एका 70 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह पुराच्या पाण्यातून काढण्यात आला. न्यू यॉर्क शहरात एकाच कुटुंबातल्या चौघांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ते त्यांच्या घराच्या तळमजल्यात अडकले होते. मेक्सिकोला लागून असलेल्या अमेरिकेतल्या लुइझियाना राज्यात चक्रीवादळ आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या राज्यातल्या लाफिटे आणि जीन लाफिटे या शहरांना जोडणारा पूल या चक्रीवादळामुळे मोडून पडला. लुइझियाना राज्यातल्या हायवेची परिस्थिती एखाद्या नदीसारखी झाली होती. याच राज्यातल्या हाउमामध्ये रस्त्यावरचे विजेचे खांबही कोसळले. पुरानंतर रिलायन्स एस्प्लेनेड अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली आणि त्यात संपूर्ण अपार्टमेंट जळून खाक झाली.
फिलाडेल्फियामधल्या मनायुंकमध्ये सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे रस्त्यावरच्या कार्स पाण्यात बुडाल्या. अनेक ठिकाणी पूर आला असून, मदत व बचावकार्य सुरू आहे.