नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : कार उत्पादक कंपनी ह्युंदाईच्या पाकिस्तानमधील Hyundai Pakistan) कार्यालयाने जम्मू आणि काश्मीरवर केलेल्या ट्विटमुळे भारतातून मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त केला गेला. याचा परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आला. या सगळ्या घडामोडीनंतर दक्षिण कोरियाचे (South Korea) परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांना फोन करुन दिलगिरी व्यक्त केली. पण, हे सर्व कुठून सुरू झालं? यामागचं नेमकं कारण काय? वादाची थिणगी कुठे पडली? पाकिस्तानमध्ये 5 फेब्रुवारी हा ‘काश्मीर एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. वास्तविक, या प्रदेशात मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप भारताने सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय मंचांवर फेटाळले आहेत. याच दरम्यान, ह्युंदाई पाकिस्तानने एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले, “काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देताना शहीद झालेल्या बांधवांचे स्मरण करून आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत, कारण स्वातंत्र्यलढा अजूनही सुरू आहे. 5 फेब्रुवारीला पाकिस्तान काश्मीर एकता दिवस (Kashmir Solidarity Day ) साजरा करतो.” असं ट्विट करुन ह्युंदाई काश्मीरच्या दहशतवाद्यांना पाठिंबा देऊन नकारात्मक मार्केटिंगमध्ये अडकली. या ट्विटविरोधात आवाज उठताच ह्युंदाई पाकिस्तानने आपले ट्विट डिलीट केले. पण हे ट्विट लक्षात येताच भारतात #BoycottHyundai चा ट्रेंड जोरात आला आहे.
यानंतर Hyundai India ने देखील लोकांचा राग शांत करण्यासाठी औपचारिक निवेदन जारी केले आहे. ह्युंदाई इंडियाने या विधानात स्पष्टीकरण देण्याचे ठरवले आहे की ते राष्ट्रवादाच्या समर्थनार्थ उभे आहेत. कंपनीने म्हटले आहे की भारत हे Hyundai ब्रँडचे दुसरे घर आहे आणि सोशल मीडिया पोस्ट या महान देशाप्रती आमची बांधिलकी आणि सेवाभावना दुखावत आहे.
सरकारकडून तीव्र प्रतिक्रिया भारत सरकारने ह्युंदाईच्या काश्मीरवरील वादग्रस्त वक्तव्यावर मंगळवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भारत सरकारने याबाबत दक्षिण कोरियाच्या राजदूताला प्रश्नही विचारले होते आणि त्यांच्या या वक्तव्याबद्दल आपली नाराजीही दर्शविली होती. सेऊलमधील भारतीय राजदूतानेही हाच संदेश दक्षिण कोरिया सरकारला दिला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून कळविले की त्यांना दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांचा फोन आला आणि त्यांनी “ह्युंदाई प्रकरण"बद्दल चर्चा केली. जयशंकर यांनी ट्विट केले, “आज दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांचा कॉल आला. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर तसेच ह्युंदाई प्रकरणावरही त्यांनी चर्चा केली होती.
कंपनीकडून दिलगिरी ह्युंदाई इंडियानंतर, तिची मूळ कंपनी ह्युंदाई मोटर्स यांनी मंगळवारी एक निवेदन जारी केले आहे की ते “कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील राजकीय किंवा धार्मिक समस्यांवर भाष्य करत नाही आणि भारतीयांना झालेल्या कोणत्याही त्रासाबद्दल आणि घडलेल्या चुकीबद्दल आम्ही खूप खेद व्यक्त करतो”.